ब्रिजलाल खुराणा

>>योगेश पाटील<<

खुराणा ट्रव्हल्सच्या माध्यमातून २५ वर्षांपूर्वी प्रवासी वाहतूक क्षेत्रात वेगळ्या वाटेवर निघालेल्या ब्रिजलाल खुराणा यांनी अतिशय परिश्रमाने पाच राज्यांत उद्योगाचा विस्तार वाढविला. हिंगोलीसारख्या मराठवाडय़ातल्या अविकसित जिह्यामध्ये उच्च शिक्षणाची दारे ब्रिजलाल खुराणा यांनी खुली करून दिली. खुराणा यांचे १३ मार्च रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाने जिल्हा एका विकसनशील व उद्यमशील व्यक्तिमत्त्वाला मुकला आहे. ब्रिजलाल टेहलाराम खुराणा यांचा जन्म १९३४ साली आताच्या पाकिस्तानातील पंजाब राज्यातल्या झंग जिह्यात शिक्षकाच्या कुटुंबात झाला. वयाच्या १३व्या वर्षी हिंदुस्थान-पाकिस्तान फाळणीची झळ सोसत कसाबसा जीव वाचवून खुराणा कुटुंब हिंदुस्थानातील पंजाब राज्यातल्या जालंधरजवळील निर्वासितांच्या छावणीत आले. निर्वासितांना मिळणारे अन्न नको तर स्वकष्टातून मिळालेले अन्न खायचे, असे आजीने सांगितल्यामुळे ब्रिजलाल खुराणा यांनी मोठय़ा भावांसह गोवऱ्या विकून पैसे कमावत आजीला अन्न आणून दिले. १९४७-४८ साली निर्वासितांच्या छावणीमध्येच ब्रिजलाल खुराणा यांच्यातील उद्योजकाचा जन्म झाला. पुढे १९५२ विदर्भातल्या वाशीममध्ये मेहुण्याच्या हॉटेलवर त्यांनी काम केले. यवतमाळ जिह्यातल्या उमरखेड आणि परभणी जिह्यातल्या पाथरी येथे स्वतःचे हॉटेल टाकल्यावर त्यांना नुकसान सोसावे लागले. पूर्णा-अकोला लोहमार्गाचे काम सुरू असल्याने १९५६ मध्ये ब्रिजलाल खुराणा हिंगोलीत आले आणि पुढील ६२ वर्षे हिंगोली हीच त्यांची कर्मभूमी बनली. हिंगोलीत ताटव्याचे हॉटेल टाकून नव्याने व्यवसायाचा श्रीगणेशा केला. हॉटेलवर आलेल्या एका अधिकाऱ्याने ब्रिजलाल खुराणा यांना इंधन विक्रीची एजन्सी मिळवून दिली. यासाठी त्या काळी सात हजार रुपये भांडवल जमा करावे लागले होते. पुढे याच इंधनाच्या एजन्सीची डीलरशिप मिळाली आणि पाच पेट्रोलपंपाचे मालक हा प्रवास घडला. १९८८ ला केंद्र सरकारने प्रवासी वाहतूक क्षेत्रात परमीट देण्याचा निर्णय घेतल्यावर सुरुवातीला हिंगोली ते मुंबई आणि हिंगोली ते नागपूर अशा दोन ट्रव्हल्स सुरू करून त्यांनी वाहतूक क्षेत्रात पदार्पण केले. १९९१ला खुराणा ट्रव्हल्सची मुहूर्तमेढ रोवताना असलेल्या दोन ट्रव्हल्सचा विस्तार आज ४०० ट्रव्हल्स व ८० व्होल्वो बसपर्यंत जाऊन पोहचला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आणि जनसंघाचे ज्येष्ठ नेते नानाजी देशमुख यांच्या संपर्क व मार्गदर्शनातून ब्रिजलाल खुराणा यांच्या सामाजिक कार्याच्या कक्षा रुंदावत गेल्या. हिंगोलीतील प्रसिद्ध दसरा महोत्सवात कृषी व विविध वस्तूंच्या प्रदर्शनीची सुरुवात त्यांनीच केली. संघविचार आणि भारतीय जनता पक्षासोबत शेवटपर्यंत त्यांची नाळ कायम राहिली. हेडगेवार रुग्णसेवा समितीच्या माध्यमातून हिंगोलीत दंत महाविद्यालय तसेच अभियांत्रिकी महाविद्यालयदेखील त्यांनी सुरू केले. हेडगेवार रुग्णसेवा समितीच्या माध्यमातून गरीबांना अल्पदरात उपचारासाठी सुविधा निर्माण केली. राष्ट्रऋषी नानाजी देशमुख प्रतिष्ठानची स्थापना करून कडोळीसारख्या लहान गावात अल्प दरामध्ये संस्कारक्षम प्राथमिक शिक्षणासाठी इंग्रजी माध्यमाची शाळा देखील त्यांनी सुरू केली आहे. संत नामदेव सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून लहान-मोठय़ा उद्योग उभारणीसाठीही खुराणा यांनी प्रयत्न केले आहेत. कधी काळी भाकरीच्या शोधार्थ हिंगोलीला आलेल्या ब्रिजलाल खुराणा यांच्यामुळे उद्योग आणि विविध संस्थांमध्ये १० हजारच्या वर कुटुंबाला नोकरीच्या माध्यमातून जगण्याचा आधार मिळाला आहे. कष्ट करण्याची तयारी, शिस्तबध्द जीवन, वक्तशीरपणा, सचोटीच्या जोरावर ब्रिजलाल खुराणा यांनी हिंगोलीसारख्या लहान जिह्यात राहूनही कार्य कर्तृत्वाचा अमिट ठसा उमटविला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या