ठसा

72

संदीप दास

अमेरिकेच्या ध्वनिमुद्रण अकादमीच्या वतीने ५९  वर्षांपासून ‘ग्रॅमी’ पुरस्कार देण्यात येतो. यंदा हिंदुस्थानी कलावंत तबलावादक संदीप दास यांचा या जागतिक स्तरावरील पुरस्काराने सन्मान झाला. संगीत क्षेत्रात विशेषतः तबलावादनासह हिंदुस्थानी आणि पाश्चात्त्य संगीतरचना बांधणीत त्यांनी योगदान दिले. त्यांच्या ‘सिंग मी होम’ या संगीतरचनेस ग्रॅमी पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्काराने त्यांना मानाचे स्थान मिळवले आहे, असा जागतिक पुरस्काराचा सन्मान यापूर्वी ख्यातनाम सतारवादक पं. रविशंकर, तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन, घटमवादक टी. एम. विनायकम, मोहनवीणावादक विश्वमोहन भट्ट, संगीतकार ए. आर. रहेमान, संगीतकार एच. श्रीधर आणि पी. ए. दीपक तसेच गतवर्षीचे रिकी केज यांना प्राप्त झाला आहे. पं. रविशंकर यांना दोनदा तर त्यांची कन्या नोरा जोन्स यांचाही या पुरस्काराने जागतिक स्तरावर सन्मान झाला आहे. संदीप दास आणि रविशंकर यांचे नाते गुरू-शिष्याचे. रविशंकर यांच्यासोबतचा पहिला कार्यक्रम दास यांनी पाटणा येथे पंधराव्या वर्षी केला. तसेच त्यांनी लहानपणी पं. किशन महाराज यांचे गंडाशिष्यत्वही स्वीकारले. बनारस घराण्याशी दास यांचा फार पूर्वीपासून स्नेहसंबंध राहिला आहे. मान्यवर दिग्गजांसोबत तबलावादनाची साथ करण्यासाठी त्यांनी पाटणा, बनारस, दिल्ली असा प्रवास केला. संदीप दास तबलावादक असले तरी हिंदुस्थानी व पाश्चात्त्य शैलीत संगीतरचना करतात. जागतिक स्तरावरील कलावंतांच्या वाद्यसमूहात आपल्या कलेचा आविष्कार करीत असतानाच त्यांनी आपले अल्बमही पुढे आणले. त्यांना ग्रॅमीचे नामांकन याआधी दोन वेळा मिळाले होते, पण प्रत्यक्ष ग्रॅमी पुरस्कार स्वीकारण्याचा योग मात्र नुकताच जुळून आला. संगीतरचनेशी ते इसवी सन २००० पासून संबंधित आहेत. त्यावर्षी सिल्क रूट एसेंबल हा ब्रँड आला. त्यासाठी दास यांनी आपल्या संगीतरचना बांधल्या. ‘सिंग मी होम’ या त्यांच्या रचनेस यंदाचा ग्रॅमी सन्मान लाभला आहे. ‘सिंग मी होम’ म्हणजेच घराची संकल्पना त्यांनी जगभरातल्या विविध शैलीत साकारली. विशेष म्हणजे घर या बदलत जाणाऱया स्वरूपावर दास यांनी भाष्य केले आहे. दास यांच्या या सन्मानाने हिंदुस्थानी संगीतपरंपरेचा मोठा सन्मान झाला आहे.

आलोक राजवाडे

फोर्ब्स इंडिया थर्टी अंडर थर्टी’ या आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध झालेल्या यादीत आलोक राजवाडे या पुणेकर मराठमोळय़ा तरुणाचा समावेश झाला. सत्तावीस वर्षीय आलोक यांनी नाटय़क्षेत्रातील कारकीर्दीचा श्रीगणेशा पुण्यातील ‘अक्षरनंदन’ या शाळेपासून केला. जागर संस्थेच्या माध्यमातून ‘अब्राहम लिंकनचे पत्र’ या नाटकातून त्यांचे रंगभूमीवर पदार्पण झाले. महाविद्यालयीन वाटचालीच्या उंबरठय़ावर जसे अनेक रंगकर्मींना ‘पुरुषोत्तम करंडक’ स्पर्धेचे आकर्षण असते तसे आलोक यांनाही होते. महाविद्यालयीन जीवनात ‘पुरुषोत्तम’सह अनेक स्पर्धांत त्यांनी सहभाग घेतला. पुढील काळात नाटय़ाविष्कारासाठी त्यांना ‘आसक्त’ आणि ‘समन्वय’ या संस्थांच्या माध्यमातून प्रायोगिक रंगभूमी लाभली. नंतरच्या काळात समान आवड असलेल्या मित्रमंडळीने ‘नाटक कंपनी’ ही संस्था स्थापन केली. या माध्यमातून बिनकामाचे संवाद, शिवचरित्र आणि एक, सिंधू सुधाकर रम आणि इतर या नाटकाचे दिग्दर्शन आलोकने केले. दिग्दर्शक हा अभिनेताही असतो हे त्यांनी आषाढातील एक दिवस, बेड के नीचे रहनेवाली आणि दळण या नाटकांतील कसदार भूमिकेतून सिद्ध केले. भूमिका मग ती रंगभूमीची असो की, चित्रपटातील असो, त्यात वेगळेपणा असतोच; ‘विहीर’, ‘हा भारत माझा’, ‘बोक्या सातबांडे’, आणि ‘राजवाडे ऍण्ड सन्स’ या चित्रपटांतून आलोकने आपल्या अभिनयाची चुणुक दाखवली. उधेडबुन, कातळ या राष्ट्रीय स्तरावरच्या लघुपटांतही त्यांना काम करण्याची संधी मिळाली. आलोकच्या अभिनयाचे वैशिष्टय़ म्हणजे ते नाटकातील आवाज, संहिता आणि भाषा या सर्वच बाबींमध्ये सुवर्णमध्य साधतात. हिंदुस्थानातील रंगमहोत्सव, पृथ्वी थिएटरमधील समरटाइम फेस्टिव्हल यात त्यांना नाटय़कृती सादर करण्याची संधी मिळाली. आंतरराष्ट्रीय स्तरावरील इटाली येथील युनिव्हर्सल थिएटर हा आंतरराष्ट्रीय महोत्सवही त्यांनी आपल्या कसदार अभिनयाने गाजवला. फोर्ब्स यादीमध्ये त्यांच्या नावाचा समावेश होणे म्हणजेच आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या वेगळय़ा कर्तबगारीची मुद्रा उमटवणे होय. त्यांची ही आश्वासक कामगिरी जागतिक स्तरावर आता अधोरेखित झाली आहे.

लेखक – प्रशांत गौतम

 

आपली प्रतिक्रिया द्या