…तर पांड्याच्या नावावर जमा झाला असता ‘नकोसा’ विक्रम

18

सामना ऑनलाईन । विशाखापट्टणम

क्रिकेट हा नेहमी अनिश्चिततेचा खेळ मानला जातो. इथे प्रत्येक सामन्यात अनेक नवीन विक्रम होत असतात. अनेकवेळा खेळाडूला किंवा संघाला नकोसा असणारा विक्रमही होताना आपण पाहिले आहे. हिंदुस्थान आणि श्रीलंका संघात विशाखापट्टणम येथे तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील निर्णायक सामन्यातही हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर एक नकोसा विक्रम झाला असता. परंतु एका चेंडूने पांड्या आणि हिंदुस्थानच्या संघाला नकोसा असणारा विक्रम वाचवला.

नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी घेतलेल्या हिंदुस्थानने लंकेला १५ धावांवर पहिला धक्का दिला. त्यानंतर थरंगा आणि समरविक्रमा यांनी शतकी भागिदारी करत संघाचा डाव सावरला. या दरम्यान हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर थरंगा तुटून पडला. लंकेच्या डावातील ९व्या षटकामध्ये पांड्याच्या गोलंदाजीवर लंकेचा फलंदाज उपूल थरंगाने पहिल्या पाच चेंडूवर सलग पाच चौकार मारले. मात्र सहाव्या चेंडूवर थरंगा एकही धाव घेऊ शकला नाही आणि पांड्याच्या व हिंदुस्थानी खेळाडूंच्या जीवात जीव आला. थरंगाने सहाव्या चेंडूवरही चौकार मारला असता तर सलग सहा चौकार खाणारा पांड्या एकदिवसीय क्रिकेटमधील दुसरा गोलंदाज झाला असता.

एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासामध्ये सलग सहा चौकार खाणारा एकमेव खेळाडू ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल जॉन्सन आहे. २०१५मध्ये झालेल्या विश्वचषकामध्ये श्रीलंकेच्या तिलकरत्ने दिलशानने जॉन्सनच्या गोलंदाजीवर सलग पाच चौकार ठोकले होते.

आपली प्रतिक्रिया द्या