
सामना प्रतिनिधी । मुंबई
अंधेरी-चकाला येथील एका मेडिकल दुकानावर पालिकेने प्लॅस्टिक पिशव्यांविरोधातील कारवाई केल्याचा मेसेज आज सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. दुकानाला पाच हजारांचा दंड केल्याची पावतीही व्हायरल झाली होती, मात्र ही कारवाई प्लॅस्टिकबंदीच्या विरोधातील नसल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. प्लॅस्टिकबंदी अंतर्गत २३ जूनपर्यंत कोणालाही दंड केला जाणार नसल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
गुढीपाडव्यापासून राज्य सरकारने राज्यात प्लॅस्टिकच्या वापरावर बंदी घातली आहे. त्यातच आज व्हायरल झालेल्या या मेसेजमुळे मुंबईकरांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले. तुमच्या हातात प्लॅस्टिकची बॅग दिसली तरी तुम्हाला दंड होऊ शकतो असेही या मेसेजमध्ये म्हटले होते. त्यामुळे काही काळ संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र २३ जूनपर्यंत कारवाई केली जाणार नसल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
ही कारवाई जुन्या नियमानुसार
आज चकाला येथे करण्यात आलेली कारवाई ही जुन्या नियमानुसार केली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. २६ जुलैच्या अतिवृष्टीनंतर मुंबईमध्ये ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या वापरण्यास बंदी आहे. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली होती. ५० मायक्रॉनपेक्षा वरील पिशव्यांवर सध्या तरी कारवाई केलेली नाही असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
प्लॅस्टिकबंदीची अंमलबजावणी करण्यास राज्य सरकारने तीन महिन्यांची मुदत दिली आहे. त्यामुळे २३ जूननंतरच कारवाई केली जाणार आहे. तेव्हा मात्र ५० मायक्रॉनच्या वरील पिशव्या आणि एकूणच प्लॅस्टिकच्या वापराविरोधात कारवाई केली जाणार आहे.
- निधी चौधरी, उपायुक्त, अतिक्रमण निर्मूलन
तेच कर्मचारी दंड ठोठावणार
प्लॅस्टिकबंदीची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होते की नाही याची तपासणी करण्यासाठी काही कर्मचाऱ्यांची टीम तयार करण्याचे ठरवले आहे. प्लॅस्टिकबंदीची अंमलबजावणी केली जात असताना कुणाला वेठीस धरले जाणार नाही किंवा काही गैरफायदा घेतला जाणार नाही. याकरिता ज्या कर्मचाऱयांना प्लॅस्टिकबंदीच्या तपासणीचे काम सोपविले जाईल त्यांनी स्पष्टपणे दिसेल अशा पद्धतीने आपल्या पोशाखावर ‘नेम प्लेट’ लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. याचसोबत कारवाईदरम्यान तसेच कर्तव्यावर असताना प्रत्येक वेळी आपले ओळखपत्र सोबत बाळगणेदेखील आवश्यक आहे.