
या ना त्या कारणाने रखडलेल्या अलिबाग- रोहा रस्त्याच्या कामावरून भाजप-मिंधे गटात चांगलीच जुंपली आहे. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भोईर यांनी कामाचा नारळ बुधवारी फोडल्यानंतर आज घाईघाईत आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी यांनीदेखील कार्यकर्त्यांसह बेलकडे येथे गाजावाजा करत नारळ फोडला. या कामाशी भाजपचा कोणताही संबंध नसून फुकटचे श्रेय उपटू नये, अन्यथा आमचे कार्यकर्ते त्यांना धडा शिकवतील, असा दमच आमदार पत्नीने भोईर यांना भरला.
अलिबाग- रोहा या 85.620 किलोमीटर रस्त्यासाठी 177 कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे. तीन वर्षांपूर्वी जेआरए एजन्सी या ठेकेदारास कार्यारंभ आदेश देण्यात आले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाने या कामाचे सुमारे 18 कोटी रुपये अॅडव्हान्स म्हणून ठेकेदार कंपनीला दिले होते, परंतु काही कारणास्तव ठेकेदार कंपनीने हे काम न करता पळ काढला. त्यानंतर दुसरा कंत्राटदार ब्लॅकलिस्टमध्ये गेल्याने त्यालाही हे काम पूर्ण करता आले नव्हते, त्यामुळे रस्त्याचे काम रखडले. यानंतर शासनाने नवीन ठेकेदार नेमला असून भोईर यांनी कामाचा नारळ फोडल्यानंतर मानसी दळवी व मिंधे गटाच्या कार्यकर्त्यांनीही बेलकडे येथे रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यासाठी दुसरा नारळ फोडला.
खोटारडेपणा खपवून घेणार नाही
अलिबाग- रोहा या रस्त्याचे काम आमच्यामुळेच होत असून भाजपचे याच्याशी काही देणेघेणे नाही. श्रेयवादाच्या नावाखाली भाजप पदाधिकाऱ्यांचा खोटारडेपणा खपवून घेतला जाणार नाही. आमचे कार्यकर्ते त्यांना योग्यवेळी धडा शिकतील, असा इशाराच मिंधे गटाने तालुक्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांना दिला आहे.