34 व्या महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाटय़ स्पर्धेच्या अंतिम फेरीत भरत जाधव एंटरटेनमेंट या संस्थेच्या ‘अस्तित्व’ नाटकाने प्रथम क्रमांक पटकावला. या नाटकाला 7 लाख 50 हजार रुपयाचे पारितोषिक मिळाले. मल्हार या संस्थेच्या ‘गालिब’ नाटकाला 4 लाख 50 हजाराचे द्वितीय पारितोषिक आणि अभिजात क्रिएशन्स या संस्थेच्या ‘चाणक्य’ नाटकाला तीन लाख रुपयांचे तृतीय पारितोषिक मिळाले.
सांस्पृतिक कार्य संचालनालयाने घेतलेली ही स्पर्धा 24 जुलै ते 3 ऑगस्ट 2024 या कालावधीत यशवंत नाटय़ मंदिर, माटुंगा, येथे पार पडली. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून रवींद्र पाथरे, मंगेश कदम, प्रमोद पवार, शंभु पाटील व नीना राऊत यांनी काम पाहिले.
दिग्दर्शनाचे प्रथम पारितोषिक स्वप्निल जाधव (नाटक- अस्तित्व), द्वितीय चिन्मय मांडलेकर (नाटक- गालिब), तृतीय पारितोषिक संतोष पवार (नाटक- मर्डरवाले पुलकर्णी) यांना मिळाले.
नाटय़लेखनासाठी स्वप्निल जाधव (नाटक- अस्तित्व) यांनी प्रथम पारितोषिक मिळाले. द्वितीय पारितोषिक हर्षदा बोरकर (नाटक- जन्मवारी), तृतीय पारितोषिक इरावती कर्णिक (नाटक- जर तरची गोष्ट) यांनी पटकावले.