प्रेयसीला भेटायला गेलेल्या तरुणाचा खून

35

सामना प्रतिनिधी । भोकरदन

प्रेयसीला भेटायला गेलेल्या तरुणाच्या खून प्रकरणी दोघा संशयित आरोपींना २६ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. ही घटना भोकरदन तालुक्यातील वजीरखेडा येथे घडली.

बदनापूर तालुक्यातील सेलगाव येथील एका तरुणीचे अशोक ऋषिंदर कोरडे (रा.दरेगाव, ता.जालना) या तरुणाशी प्रेमसंबंध होते. सदरील तरुणी (वजीरखेडा, ता. भोकरदन) मामाच्या गावी गेली असता अशोक कोरडे हा २१ मार्च रोजी तिला भेटायला गेला असता त्याला मुलीचा आजोबा व मामाने पकडून कुऱ्हाडीच्या दांड्याने व काठीने बेदम मारहाण केली होती. अशोकने त्याला झालेल्या मारहाणीची माहिती मित्र अर्जुन सुंदरडे याला फोन करून सांगितली. अर्जुन तेथे आला असता त्याला देखील मुलीच्या नातेवाईकांनी मारहाण केली. अर्जुनने जखमी अशोक कोरडेला हसनाबाद व नंतर जालना येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान अशोकचा मृत्यू झाला.

याप्रकरणी सुरूवातीला जालना येथे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर २२ मार्च रोजी रात्री उशिरा अशोकचे वडील ऋषिंदर कोरडे यांनी हसनाबाद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. हसनाबाद पोलिसांनी मुलीचे वजीरखेडा येथील आजोबा लक्ष्मण हरिबा फुके व गजानन लक्ष्मण फुके या दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल करून अटक केली. घटनास्थळी भोकरदनचे उपविभागीय पोलीस अधिकारी ईश्वर वसावे यांनी भेट दिली व पंचनामा करून मारहाणीत वापरलेल्या दांड्या व लाठ्या जप्त केल्या. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक जी. एन. पठाण करीत आहेत. दरम्यान, आज दोघा संशयित आरोपींना भोकरदन न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयाने २६ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या