भावाने घातला भावाला गंडा

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

पत्नीचे निधन झाल्याने मोठ्या भावाने दुकानात जाणे बंद केले. याचाच फायदा उचलत लहान भावाने मोठ्या भावाच्या कागदपत्राआधारे बजाज आणि टाटा फायनान्स कंपनीच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून २४ लाखांचे कर्ज उचलले. हप्ते थकल्याने लहान भावाने गंडा घातल्याचे उघड झाले. या प्रकरणी वेदांतनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून गंडेखोर भावास अटक केली.

गुरुसहानीनगरातील दीपक चंद्रकांत निकम यांचे जाधववाडीत निकम ट्रेडर्स नावाने धान्य विक्रीचे दुकान आहे. पत्नीचे निधन झाल्याने ते तीन वर्षांपासून घरीच राहत होते. लहान भाउâ अमोल हा दुकान सांभाळत होता. भाऊ दीपक दुकानात येत नसल्याने अमोल याने त्यांच्या कागदपत्रांआधारे बजाज फायनान्स कंपनीचा अमोल बिरारे यास हाताशी धरून १४ ऑक्टोबर २०१५ ला १४ लाख १० हजारांचे कर्ज घेतले. त्यानंतर अमोल निकम याने १ जून २०१६ ला त्याच कागदपत्रांआधारे टाटा फायनान्स कंपनीकडून पुन्हा दहा लाखांचे कर्ज उचलले. दोन्ही चेक त्याने दीपक यांच्या खात्यात जमा करून रक्कम परस्पर उचलली. योगायोगाने दीपक निकम हे दुकानावर गेले असता त्यांना फायनान्स कंपनीचे कर्मचारी चकरा मारत असताना दिसले. यावरून त्यांचा संशय बळावला. काही दिवसानंतर दोन्ही फायनान्स कंपनीने रितसर नोटीस पाठवली असता अमोल निकम याचे बिंग फुटले. या प्रकरणी वेदांतनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील यांनी गुन्हा दाखल करून अमोल चंद्रकांत निकम यास अटक केली. तसेच या कर्ज प्रकरणात कोणतीही शाहनिशा न करता कर्जाचे वितरण करणाऱ्या फायनान्स कंपनीच्या अमोल बिरारेसह आठ जणांना अटक करण्यात येणार असल्याचे प्रवीण पाटील यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या