कन्नमवारनगरच्या संक्रमण शिबिरातील इमारतीचा पीलर कोसळला

सामना प्रतिनिधी । मुंबई

विक्रोळी येथील कन्नमवारनगरमधील संक्रमण शिबिरातील ४० वर्षांपूर्वीच्या १३१ क्रमांकाच्या इमारतीचा पीलर बुधवार रात्री कोसळल्यामुळे रहिवाशांमध्ये घबराट उडाली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी त्यातील रहिवासी बेघर झाले. त्यामुळे त्यांचे तातडीने पुनर्वसन करणे आवश्यक होते. याची माहिती मिळताच स्थानिक आमदार सुनील राऊत यांनी पुढाकार घेत रहिवाशांना जवळच्याच म्हाडाच्या संक्रमण इमारतीत घरे मिळवून दिली.

बुधवारी रात्री संक्रमण शिबिरातील इमारतीचा पीलर कोसळल्यामुळे बेघर झालेल्या रहिवाशांनी आपले गाऱहाणे आमदार सुनील राऊत यांच्याकडे मांडले. त्यांनी याची तातडीने दखल घेत गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांच्याशी बोलून याची माहिती दिली. रहिवाशांचे पुनर्वसन आजच्या आज केले नाही तर मला जनआंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा त्यांनी म्हाडा प्राधीकरणाला दिला. याची दखल घेत प्राधीकरणाने आज सुनील राऊत यांच्या हस्ते चावी वाटप करून बेघर झालेल्या रहिवाशांना दिलासा दिला. रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांचे राऊत यांनी आभार मानले. चावी वाटपावेळी नगरसेवक उपेंद्र सावंत, उपविभागप्रमुख चंद्रशेखर जाधव आणि म्हाडा प्राधीकरणाचे अधिकारी उपस्थित होते.