अपघातग्रस्त AN-32 विमानाचा CVR व FDR सापडला, तपासाला वेग

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हवाई दलाचे बेपत्ता झालेले AN-32 चे अवशेष 11 जून रोजी अरुणाचल प्रदेशातील टेटो परिसरात सापडले असून विमानातील सर्व 13 जवान शहीद झाल्याचे जाहीर करण्यात आले. 3 जून रोजी आसामच्या जोरहाट विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर हे विमान 13 जणांसह बेपत्ता झाले होते. AN-32 विमानाचा अपघात नेमका कसा झाला याबाबतचा तपास सुरू आहे. शुक्रवारी या दुर्घटनाग्रस्त विमानाचा कॉकपीट व्हॉइस रेकॉर्डर (CVR) आणि फ्लाइट डाटा रेकॉर्डर (FDR)  शोधपथकाच्या हाती लागला आहे.

गुरुवारी सकाळी शोध पथकाला AN-32 विमान अपघातग्रस्त झालेल्या घटनास्थळावर पोहोचण्यात यश आले होते. त्यावेळी विमानातील कोणीही जिवंत नसल्याचे आढळल्याने सर्व 13 जण शहीद झाल्याचे हवाई दलाने घोषित केले. सध्या घटनास्थळी खराब हवामान असल्यामुळे बचाव कार्याला विलंब होत आहे. शोध पथकाकडून दुर्घटनाग्रस्त विमानाचे अवशेष गोळा करण्याचे काम अद्याप सुरू आहे. बचावकार्य लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी लष्कर तसेच वायुदलाच्या जवानांसह स्थानिक नागरिकांच्या मदतीने प्रयत्न सुरू आहेत. शुक्रवारी शोध पथकाला दुर्घटनाग्रस्त विमानाचा कॉकपीट व्हॉइस रेकॉर्डर आणि फ्लाइट डाटा रेकॉर्डर सापडले आहेत. त्यामुळे AN-32 विमानाच्या अपघाताबाबतच्या तपासाला गती मिळणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या