दोन्ही देशांतील संघर्ष टोकाला; कॅनडाच्या नागरिकांना हिंदुस्थानात प्रवेश बंदी

खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्या प्रकरणात हिंदुस्थानचा हात असल्याचा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी केल्यानंतर दोन्ही देशांतील संघर्ष टोकाला पोहोचला आहे. दोन्ही देशांनी एकमेकांच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली. आता हिंदुस्थानने आक्रमक भूमिका घेताना कॅनडाच्या नागरिकांना प्रवेशबंदी केली आहे. त्यासाठी कॅनडातील हिंदुस्थानी उच्चायुक्तालय आणि वाणिज्य दुतावासातील व्हीसा सेवा बंद केली आहे. हिंदुस्थानने पहिल्यांदाच कॅनडाबाबत हे मोठे पाऊल उचलले आहे.

हिंदुस्थानात गंभीर गुन्हे करून कॅनडात किमान 11 खलिस्तानी दहतशतवाद्यांनी आश्रय घेतला आहे. कॅनडा सरकारचे या दहशतवाद्यांना संरक्षण आहे. कॅनडातून किमान नऊ खलिस्तानवादी दहशतवादी संघटना हिंदुस्थानविरोधी कारवाया करत आहेत. हरदीपसिंग निज्जर या दहशतवाद्याची 18 जून 2023ला हत्या करण्यात आली. यावरून कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी हिंदुस्थानवर आरोप केले आणि संघर्ष टोकाला गेला.

पूर्वग्रहदूषित आरोप करण्यापेक्षा कॅनडाच्या भूमिवरून हिंदुस्थानविरोधी कारवाया करणाऱ्या खलिस्तानवादी व्यक्ती आणि गटांवर थेट कारवाई करा, अशी हिंदुस्थानची मागणी आहे, याचा पुनरूच्चार परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी आज पत्रकार परिषदेत केला.

कॅनडात तब्बल 60 लाख हिंदुस्थानी नागरिक असून, पंजाबींची संख्या लक्षणीय आहे. अनेकजणांकडे कॅनडाचे नागरिकत्व आहे. प्रवेशबंदीमुळे त्यांना हिंदुस्थानात येता येणार नाही.

कॅनडात उच्च शिक्षणासाठी दरवर्षी हजारो हिंदुस्थानी विद्यार्थी जातात. सध्या 6 लाख विद्यार्थी तेथे शिक्षण घेत आहेत. दोन्ही देशांतील संघर्ष टोकाला पोहचल्यामुळे विद्यार्थ्यांप्रमाणेच हिंदुस्थानातील त्यांचे पालकही चिंतेत आहेत.

परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात पॅनडातील हिंदुस्थानी नागरिकांनी विशेषतः विद्यार्थ्यांनी सतर्क राहावे आणि काळजी घ्यावी, असे म्हटले आहे.

आणखी एका खलिस्तानी दहशतवाद्याची हत्या

कॅनडात खलिस्तानी दहशतवादी गँगस्टर सुखदूलसिंग ऊर्फ सुक्खा याची विन्निपेग येथे गोळ्या झाडून हत्या केली. या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिष्नोई गँगने घेतली आहे. सुक्खा हा गँगस्टर होता. पंजाबसह इतर राज्यांमध्ये त्याच्यावर 20हून अधिक गंभीर गुन्हे दाखल होते. 2017 मध्ये तो कॅनडाला पळून गेला. सुक्खाचे चुलते, आई आणि बहीण कॅनडातच आहेत.

व्हिसा सेवेला स्थगिती

हिंदुस्थानच्या परराष्ट्र मंत्रालयाने निवेदन जारी केले असून, पॅनडातील नागरिकांसाठी व्हिसा सेवेला तात्पुरती स्थगिती देत असल्याचे जाहीर केले आहे. मात्र, ही प्रवेशबंदी किती दिवस राहणार हे स्पष्ट केले नाही. तसेच इतर देशांमध्ये राहणाऱ्या कॅनेडियन नागरिकांनाही ही प्रवेशबंदी लागू असणार आहे.

6 लाख विद्यार्थी, पालक चिंतेत

कॅनडात तब्बल 6 लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. प्रवेशबंदीमुळे त्यांना हिंदुस्थानात येता येणार नसल्याने विद्यार्थ्यांप्रमाणेच त्यांचे पालकही चिंतेत आहेत.

हिंदू खतरे में!

पंतप्रधान ट्रुडो यांच्या पक्षाचे खासदार चंद्रा आर्य यांची स्वपक्षाच्या सरकारवरच जोरदार टीका केली आहे. कॅनडातील शीख फॉर जस्टीसचा अध्यक्ष गुरपतसिंग पन्नू याने पॅनडातील हिंदूंनी हिंदुस्थानात निघून जावे, असा इशारा दिला आहे. त्यामुळे हिंदू खतरे में आहेत. हिंदू प्रचंड दहशतीखाली आहेत, असे खासदार चंद्रा आर्य यांनी म्हटले आहे. पॅनडातील बहुसंख्य शीख समुदायाचा खलिस्तानवादी कारवायांना पाठिंबा नाही. शीख-हिंदू संबंध चांगले आहेत. परंतु खलिस्तानवादी हिंदूंना भडकवत आहेत, धमक्या देत आहेत, असे त्यांनी सांगितले.