‘सिनार’ कंपनीचा करार महाविकास आघाडीच्या काळातला; आदित्य ठाकरेंनी ट्विट करत दिला पुरावा, खोके सरकारने केला उशीर

महाराष्ट्र सरकारने मंगळवारी इंडोनेशियातील ‘सिनार मास पल्प अँड पेपर’ या कंपनीला राज्यात 10,500 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठी जमीन दिल्याचे वृत्त प्रसिद्ध झालं आहे. या गुंतवणुकीचे श्रेय शिंदे-फडणवीस सरकार घेत असतानाच शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत सरकारचा पर्दाफाश केला आहे.

आदित्य ठाकरे यांनी काही वेळापूर्वीच एक ट्विट करत शिंदे – फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे.

‘आज जेव्हा आपण ‘सिनार मास पल्प अँड पेपर’ कंपनी महाराष्ट्रात येत असल्याबद्दल वाचतो आणि त्याचे स्वागत करतो, तेव्हा माझे मन मला त्या क्षणाची आठवण करून देते जेव्हा आम्ही महाविकास आघाडी सरकार म्हणून दावोसमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली’, असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी मे महिन्यातील MIDC चा स्क्रीनशॉट शेअर करून शिंदे-फडणवीस सरकारच्या दाव्यातील खोटेपणा उघडा पाडला आहे.

त्यासोबतच स्वाक्षरी झालेला करार अंमलात आणण्यासाठी पाच महिने लागत असतील तर उद्योगधंदे आकर्षित होणार नाहीत, असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी टोला देखील लगावला आहे. ट्विटमध्ये ते म्हणातात. ‘करार अंमलात आणण्यासाठी खोके सरकारला 5 महिने लागले आहेत. ते याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र ही गती उद्योगांना आकर्षित करणार नाही.’ आदित्य ठाकरे यांच्या या ट्विटने शिंदे-फडणवीस सरकारचं पितळ उघडं पडलं असून महाविकास सरकारचं श्रेय ते लाटत असल्याची त्यांची प्रतिमा तयार झाल्याचं बोललं जात आहे.