शहिदांच्या कुटुंबीयांमुळे देश सुरक्षित

38

सामाना ऑनलाईन । चिपळूण

जोपर्यंत आपल्या देशात शहिदांची कुटुंबे आहेत तोपर्यंत आपला देश आणि देशातील नागरिक सुरक्षित आहेत. देशाकरिता बलिदान करणारे जवान व त्यांना जन्म देणारे माता-पिता जोपर्यंत आहेत तोपर्यंत हिंदुस्थान व हिंदुस्थानात राहणाऱ्या नागरिकांना कोणताही धोका नाही. सीमेवर देशाचे आणि देशवासीयांचे रक्षण करणारे जवान आहेत म्हणूनच तुम्ही आम्ही सुखाने झोपतो असे भावनिक वक्तव्य केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी येथे काढले.

चिपळूण जिमखाना व शिवसेनेच्या वतीने २६/११च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात मृत्यू पावलेल्या शहिदांच्या कुटुंबीयांचा सन्मान कृतज्ञता सोहळय़ात करण्यात आला. या वेळी अनंत गीते बोलत होते. देशासाठी बलिदान करणाऱया कुटुंबांची परंपरा खेड, चिपळूण तालुक्यात आहे. म्हणूनच खेड आणि चिपळूण तालुक्यांची शहिदांचा तालुका म्हणून ओळख आहे, अशा शब्दात अनंत गीते यांनी शहिदांच्या कुटुंबियाप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

कारगिल युद्ध व अरुणाचल प्रदेशातील पुरातील लोकांना वाचवताना शहीद झालेल्या मंडणगडमधील राजेंद्र गुजर यांच्या कुटुंबीयांचा सन्मान करण्यात आला. तसेच चिपळूणचे सुपुत्र एअर मार्शल हेमंत भागवत यांचा नागरी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जिल्हाप्रमुख सचिन कदम, आमदार सदानंद चव्हाण, तालुकाप्रमुख प्रताप शिंदे, नगरसेवक उमेश सकपाळ आदींसह शिवसैनिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या