रत्नपूर तालुक्यातील गल्लेबोरगाव नजीक असलेल्या दुधारे वस्तीवर माय लेकींचे मृतदेह विहिरीमध्ये आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूचे नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.
गल्लेबोरगाव येथील शेतकरी भरत भिकन दुधारे यांची गल्लेबोरगाव आखातवाडा रोडवरील दुधारे वस्तीवर शेती आहे ते परिवारासह शेती करून वस्तीवरच राहतात. बुधवारी सायंकाळी सर्व कुटुंबीय जेवण करून झोपी गेले. भरत दुधारे सकाळी उठले असता त्यांना पत्नी वंदना व मुलगी पल्लवी हे आढळून आले नाही. त्यांनी आजूबाजूला शोध घेतला असता परिसरातील त्यांच्याच मालकीच्या विहिरीमध्ये त्यांना पत्नी वंदनाचा (35) मृतदेह पाण्यावर तरंगत असलेला आढळून आला. त्यांचा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी विहिरीकडे धाव घेतली.
वंदना यांचा मृतदेह बाहेर काढल्यानंतर पल्लवी ही आढळून न आल्याने नागरिकांनी विहिरीमध्ये शोध घेतला. तिचा मृतदेह विहिरीच्या तळाशी आढळून आला. ग्रामस्थांनी गळाच्या साह्याने पल्लवीचा मृतदेह बाहेर काढला. दुधारे वस्तीवर मायलेकींवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, सासू, सासरे असा परिवार आहे.
या घटनेमागील कारणाचा उलगडा अद्याप झालानसून, या प्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. याप्रकरणी रत्नपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास बीट जमादार राकेश आव्हाड, रमेश वराडे करीत आहेत.