लातूर शहरातील अकरावी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन व केंद्रीय पध्दतीने करण्याची मागणी

सामना प्रतिनिधी । लातूर

इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन व केंद्रीय पध्दतीने करण्यात यावी, अशी मागणी स्टुडंट्स गार्डियन्स फोरम लातुर, विद्यार्थी-पालक मंच यांच्या वतीने करण्यात आली आहे.

शहरातील महाविद्यालय, संस्था प्रवेश प्रक्रियेच्या माध्यमातून करोडो रुपयांची लूट अव्याहतपणे करीत आहेत. संस्थाचालकांच्या आर्थिक लुटीमुळे सर्वसामान्य पालकांची मुले शिक्षणापासून वंचित राहत आहेत व त्यांच्या मूलभूत हक्कावर गदा येत आहे. अनेक महाविद्यालये स्वतःच्या माहिती पुस्तिकेच्या माध्यमातून तसेच इतर प्रमाणपत्रासाठी बेकायदेशीर व अवाजवी फी आकारत आहेत. अकरावी प्रवेश प्रक्रिया केंद्रीय पद्धतीने आणि ऑनलाईन पद्धतीने केल्यास सोयीचे होणार आहे. केंद्रीय पध्दतीने आणि ऑनलाईन पध्दतीने प्रवेश प्रक्रिया राज्यात अनेक ठिकाणी चालू आहेत. विद्यार्थ्यांनी प्रत्येक महाविद्यालयात स्वतंत्र नोंदणी ऐवजी एकाच ठिकाणी केंद्रीय पद्धतीने नोंदणी करावी आणि ही सर्व प्रक्रिया आपल्या कार्यालयामार्फत राबविण्यात यावी. लातुर शहरातील सीबीएसई, आयसीएसई आणि आयफएसई यांच्या मान्यता प्राप्त कनिष्ट महाविद्यालयाची यादी तसेच मान्यता प्राप्त तुकड्या व विद्यार्थी संख्या यांची माहिती वर्तमान पत्रातुन जाहीर करावी. तसेच ती माहिती संबंधित महाविद्यालयात दर्शनीय भागावर ठळक अक्षरात फलकावर लावण्याच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी निवेदनात करण्यात येत आहे.

अकरावी प्रवेशासाठी दहावीचा निकाल लागण्यापूर्वी घेण्यात आलेल्या प्रवेश पूर्व चाचणी परीक्षा (स्क्रिनिग टेस्ट) व त्याद्वारे देण्यात आलेले प्रवेश रद्द करावेत अशा बेकायदेशीर परीक्षा घेणाऱ्या व आर्थिक लुट करणाऱ्या महाविद्यालयांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात यावे आणि अशा महाविद्यालयावर कडक कार्यवाही करण्यात यावी. अकरावीची फिस तसेच बारावीची फिस एकाच वेळी गोळा करणाऱ्या महाविद्यालयाच्या विरुद्ध कार्यवाही करावी. नियमित महाविद्यालयीन शिक्षण व त्यांची फिस यासोबतच उन्हाळी, दिवाळी वर्ग, अँडीशनल कोचिंग, नीट, जेईई, सीईटी च्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त फिस आकारली जाते व त्यातून लाखो करोडो रुपये विद्यार्थ्यांकडून लुटले जात आहेत जेणे करून गरीब व मध्यमवर्गीय शिक्षणापासून वंचित राहत आहेत, अशा विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रसंगी कर्ज काढुन मुलांचे शिक्षण पूर्ण करावे लागत आहे. यासर्व गैर मार्गावर शिक्षण विभागाचे नियंत्रण असावे, अशा विविध मागण्या करण्यात आलेल्या आहेत.

हे निवेदन शिष्टमंडळाद्वारे शिक्षण उपसंचालक एस.एम. यादगिर यांना देण्यात आले आहे. यावर अ‍ॅड. उदय गवारे, अ‍ॅड. प्रदीपसिंह गंगणे, अन्तेश्वर कुदरपाके, ताहेरभाई सौदागर, प्रा. संगमेश्वर पानगावे, अ‍ॅड. प्रदीप पाटील, शेषेराव बिरादार, बालाजी पिंपळे, अ‍ॅड. राजेश खटके, अ‍ॅड. भालचंद्र कवठेकर, मुन्ना तळेकर, संदीप पाटील, एम.एच. शेख, ओमप्रकाश आर्य, अ‍ॅड. धनंजय भिसे, पांडुरंग देडे, सनीदेवोल जाधव, अ‍ॅड. अजय कलशेट्टी, राजकुमार जोशी, विश्वनाथ कोळसुरे, एस.एम. बिदादा, अनिल जाधव, विवेक सौताडे, अ‍ॅड. देविदास बोरूळे, व्यंकटेश पुरी, निलेश पवार आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.