सरसकट कुणबीचा दाखला द्या ही मागणी ओबीसी समाजासाठी अन्यायकारक! माळी महासंघही आंदोलनाच्या तयारीत

mali-mahasangha

मराठा आरक्षणाचा मुद्दा आता आणखी तापताना दिसत आहे. मराठा आरक्षणासाठी जालन्यात मनोज जरांगे यांचं आंदोलन सुरू आहे तर दुसरीकडे मराठा समाजाला आरक्षण जरूर मिळावं मात्र इतर आरक्षणांना धक्का न लावता ते देण्यात यावं अशी मागणी जोर धरू लागली आहे. यासाठी कुणबी आणि तेली समाजाच्या संघटनांनंतर आता माळी समाज संघही पुढे आल्याचं वृत्त आहे. मराठ्यांना कुणबी म्हणून प्रमाणपत्र दिलं जाऊ नये, त्यांना ओबीसीमध्ये समाविष्ट केलं जाऊ नये अशी मागणी सरकारकडे करण्यात आल्याचं कळतं आहे. या आवाहनानंतर देखील मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले दिले तर माळी समाज मोठं आंदोलन उभारेल अशा इशारा माळी महासंघाचे अध्यक्ष अविनाश ठाकरे यांनी दिला आहे.

अविनाश ठाकरे यांनी एबीपी माझा वृत्तवाहिनीसोबत बोलताना ’52 टक्के इतकी ओबीसींची संख्या आहे, तर आरक्षण आहे ते 19 टक्के. त्याच्यात मराठा समाजाकडून कुणबी जातीचे दाखले देण्यात यावे अशीजी मागणी होत आहे याचा अर्थ त्यांना ओबीसी सर्टिफिकेट मिळावं अशी त्यांना अपेक्षा आहे. प्रत्येकानं अपेक्षा बाळगणं यात काही गैर नाही, पण आमचं म्हणणं एवढचं आहे की त्यांनी ओबीसीच्या आरक्षणात वाटा न मागता स्वत:साठी वेगळं आरक्षण मागावं किंवा ईडब्ल्यूएसचं जे आरक्षण मिळालं आहे त्यात अजून वाढ करून त्यात शेअर मागावा. मात्र ओबीसीच्या आरक्षणातून आपला वाटा मागू नये’, असं स्पष्ट मत मांडलं.

सरसकट मराठा समाजाला कुणबीचा दाखला द्या ही मागणी ओबीसी समाजावर अन्यायकारक मागणी असल्याचा उच्चार देखील त्यांनी केला. सप्टेंबर महिन्यातील जीआर देखील रद्द करण्याची आपली मागणी असल्याचं ते म्हणाले.

राज्यात आरक्षणाच्या संदार्भात सुरू असलेल्या घडामोडींसंदर्भात मंगळवारी एक बैठक घेण्यात आल्याची माहिती देण्याती आली. माळी महासंघाकडून लवकरच आंदोलन सुरू करण्यावर या बैठकीत चर्चा झाली आणि येणाऱ्या काळात जशी परिस्थिती असेल त्याप्रमाणे आम्ही उभे राहू, अशी ठाम भूमिका देखील त्यांनी घेतली आहे.