डिपी वर्ल्डच्या कामगारांची उच्च न्यायलयात धाव

16

सामना प्रतिनिधी । न्हावाशेवा

देशातील पहिले खाजगी बंदर असलेल्या एनएसआयसीटी बंदराने जेएनपीटी सोबत केलेल्या कराराचे उल्लंघन करून कामगारांची फसवणूक केली असल्याच्या कारणावरून डिपी वर्ल्डच्या कामगारांनी थेट उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. जेएनपीटी बंदराच्या जागेवर १९९७ साली बांधा वापरा आणि हस्तातंरित करा या तत्वावर आधीचे एनएसआयसीटी व आत्ताचे डीपी वर्ल्ड टर्मिनल उभारण्यात आले होते. यावेळी जेएनपीटीने कंपनीसोबत करार करताना जेएनपीटीच्या कामगारांना ज्याप्रमाणे वेतन आणि इतर भत्ते मिळतात त्याप्रमाणेच या बंदरात काम करणाऱ्या कामगारांना वेतन व भत्ते मिळाले पाहिजे असा करार केला होता. हा करार मंजूर झाल्यानंतर हे टर्मिनल एनएसआयसीटीला ३० वर्षांसाठी चालविण्यास दिले होते.

मात्र डी पी वर्ल्ड बंदरात कित्येक वर्ष कामगारांना कमी वेतनात राबवून घेत आहे. प्रत्येक वेतन वाढीच्या करारावेळी कंपनी टाळाटाळ करत असल्याने कामगारांनी थेट उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे. कामगार संघटनेचे नेते संजय पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, ”डी.पी.वर्ल्डमध्ये काम करणाऱ्या कामगारांना ३० ते ३५ हजारामध्ये राबवून घेतले जाते. ज्या कामाचा ६० ते ७० हजार पगार मिळायला हवा ते काम अवघ्या ३० ते ३५ हजारात करुन घेण्यात येते. ही कामगारांची एक प्रकारची पिळवणूक असल्याने आम्ही आत्ता थेट न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे”. याबाबत डिपी वर्ल्डचे कंपनीचे एक व्यवस्थापक संजीवन कोंकणे यांच्याकडे विचारणा केली असता, ”त्यांनी मी इथे नवीन आहे मला याबाबत काहीही माहिती नाही असे सांगितले”. या सर्वप्रकरणी उच्च न्यायलयात याचिका दाखल करण्यात आली असून या सर्व याचिकेवर काय निर्णय लागतो याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या