जिल्हा बँकेचा आर्थिक व्यवहार ठप्प, पतसंस्थांच्या आर्थिक अडचणी वाढल्या

सामना ऑनलाईन, मनमाड

मनमाड – नांदगाव तालुक्यातील लोकांच्या सुमारे २५ पतसंस्थांमध्ये जमा असलेल्या कोट्यवधी रुपयांच्या डिपॉझिट व राखीव निधीच्या रकमा नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ठेवण्यात आल्या आहेत. परंतु जिल्हा बँकेचा आर्थिक व्यवहार सध्या ठप्प असल्यामुळे जिल्हा बँकांवर अवलंबून असलेल्या पतसंस्थांनाही आता मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यावर तातडीने सकारात्मक मार्ग काढावा यासाठी नांदगाव तालुका नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीने नांदगावच्या सहाय्यक निबंधकांना एक निवेदन देण्यात आले आहे.

नांदगाव तालुक्यातील विविध पतसंस्थांनी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत विविध स्वरूपाच्या रकमा डिपॉझिट तसेच काही संस्थांचे राखीव निधीही जिल्हा बँकांमध्येही जमा करण्यात आले आहेत. नोटाबंदीनंतर गेल्या २ महिन्यांपासून जिल्हा मध्यवर्ती बँकेतर्फे पतसंस्थांना पैसे देणे बंद करण्यात आले आहे. त्यामुळे पतसंस्थांसमोर अनेक आर्थिक अडचणी उभ्या राहिल्या आहेत. त्यांना आपल्या ठेवीदारांना त्यांचे पैसे देणे शक्य होत नाहीये. परिणामी ठेवीदारांनी बँकेकडे आपल्या पैशांसाठी तगादा लावला आहे.

या सर्व बाबींबाबत नांदगाव तालुका नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीने नांदगावच्या सहाय्यक निबंधकांना एक निवेदन देण्यात आले. त्यावेळी नांदगाव तालुका पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश गवळी, उपाध्यक्ष प्रदीप बोगावत, सचिव हेमंतगवळे, दीपक गोगड, संजय खैरनार, किरण उगलुगले, नरेश फुलवाणी, भास्कर झाल्टे, बाबासाहेब उगले, ऍड. साधना गायकवाड, डॉ. शांताराम सांगळे आदी पदाधिकारी व पतसंस्थांचे चेअरमन निवेदन देण्याच्या वेळी उपस्थित होते. याबाबत राज्य शासनाच्या सर्व संबंधित विभागांनाही कळविण्यात आले असून पतसंस्थांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

सहकार विभागने सकारात्मक मार्ग काढावा
पतसंस्थांना आपल्या सभासद व खातेदारांबरोबर देवघेवीचे दैनंदिन व्यवहार पूर्ण करता यावेत व या आर्थिक टंचाईवर मात करण्यात यावी यासाठी सहकार विभागाने या प्रश्नावर सकारात्मक मार्ग काढावा. जिल्हा बँक प्रशासनाशी चर्चा करून तालुक्यातील पतसंस्थांना दिलासा द्यावा, अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या