पावसाने परतीची वाट धरताच ठाण्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा जाणवू लागला असून नागरिक घामाने बेजार होऊ लागले आहेत. ऑक्टोबर हिटचा पहिलाच दिवस ‘हिट’ ठरला असून ठाण्यात आज कमाल 35 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद पालिकेच्या आपत्ती विभागाने केली आहे. दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास चटके बसू लागल्याने अंगाची लाहीलाही झाली. उन्हाचा तडाखा टाळण्यासाठी भरदुपारी बाहेर पडू नये, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. दरम्यान येत्या काही दिवसांत उन्हाचा पारा वाढणार असून चक्कर येणे, उलटी आणि जुलाबासारखे आजार बळावण्याची शक्यता पालिकेच्या आरोग्य विभागाने वर्तवली आहे.