आदिवासी चक्कर येऊन डोहात पडला, शहापुरात पाणीटंचाईचा पहिला बळी

41

सामना ऑनलाईन, शहापूर

एकीकडे उन्हाचे चटके वाढत असतानाच ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात भीषण पाणीटंचाईने रहिवासी त्रस्त झाले आहेत. शहापूर तालुक्यात पाणीटंचाईचा पहिला बळी गेला असून तुकाराम आगीवले (३५) असे या दुर्दैवी आदिवासीचे नाव आहे. हंडाभर पाण्यासाठी तब्बल १० किलोमीटरची पायपीट केल्यानंतर उन्हाच्या लाहीने चक्कर येऊन तो आंबळे डोहात पडला. त्यात त्याचा मृत्यू झाला असून या घटनेमुळे ठाणे जिल्ह्यातील पाणीटंचाईचा भीषण प्रश्न ऐरणीवर आला आहे.

शहापूरपासून ४० किलोमीटर अंतरावरील दांडगावामध्ये मोलमजुरी करून तुकाराम परिवारासह राहत होता. गावात पाणीच नसल्याने येथील आदिवासी १० किलोमीटर अंतरावर असलेल्या आंबळे डोहात पाणी आणण्यासाठी रोज जातात. सोमवारी भरदुपारी तुकाराम हा डोक्यावर हंडा घेऊन पाण्यासाठी आंबळे डोहाकडे गेला. पायात चप्पल नाही आणि डोक्यावर आग ओकणारा सूर्य अशा स्थितीत तो चालत असल्याने डोहापर्यंत पोहचल्यावर चक्कर येऊन तो पाण्यात पडला.

परतताना तुकाराम सोबत नसल्याने ग्रामस्थांनी त्याची शोधाशोध केली पण तो दिसला नाही. रात्री तो न परतल्याने मंगळवारी सकाळी काही ग्रामस्थांनी पुन्हा तुकारामचा शोध घेतला तेव्हा पाण्यामध्ये तरंगत असलेला त्याचा मृतदेह आढळला.

…तर महामार्ग रोखू

शहापूर तालुक्यातील दांडगाव व परिसरातील विहिरी कोरड्या पडल्या असून टँकरने पाणीपुरवठा करावा अशी मागणी ग्रामस्थांनी वारंवार करूनही त्याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. शहापुरातील १६० गावपाडे टंचाईग्रस्त असून गेल्या वर्षी ११ एप्रिलपासून या भागात टँकरने पाणीपुरवठा सुरू केला होता. यंदा अजून पाणी न आल्याने आदिवासी संतप्त झाले आहेत. लवकरात लवकर गावपाड्यांवर टँकरने पाणीपुरवठा सुरू केला नाही तर नाशिक महामार्गावर ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या