बाहुबली-२ : हा आहे कालकेयाचा खरा ‘बोलविता धनी’

35
सौजन्य फेसबुक
सामना ऑनलाईन । मुंबई
बाहुबलीच्या पहिल्या भागात बाहुबलीला युद्धासाठी उद्युक्त करणाऱ्या राक्षसी, बीभत्स अशा कालकेयांनाही चांगलीच लोकप्रियता मिळाली. कुरूप चेहरा, क्रूर हावभाव यांच्या जोडीला अगम्य अशी किलीकी भाषा बोलणाऱ्या कालकेयांचा खरा ‘बोलविता धनी’ मात्र वेगळाच आहे. किलीकी या अस्तित्वात नसलेल्या भाषेचा खरा निर्माता आहे मदन कार्की वैरामुथू. मूळ तामीळ असलेला मदन हा प्रसिद्ध तामीळ कवी वैरामुथू यांचा मुलगा आहे.
मदन यांनीच बाहुबलीच्या दोन्हीही भागांसाठी गीतलेखन केलं आहे. बाहुबलीचे दिग्दर्शक राजामौली यांना या कालकेयांसाठी एक वेगळी भाषा हवी होती. ती भाषा थोडी क्रूर वाटावी, तसंच ती आदिवासींच्या भाषेसारखी असावी असा राजामौलींचा आग्रह होता. त्यासाठी मदन यांनी ७५० शब्दसंग्रह असलेली ४० व्याकरण नियमांची नवीन भाषा तयार केली. ही भाषा ऐकताना क्रूरही वाटते आणि आदिवासींसारखीही.
pastedgraphic-48
या भाषेच्या निर्मितीबद्दल मदन सांगतात की, ‘किलीकी ही भाषा मुळातच अस्तित्वात नाही. बाहुबलीमध्ये कालकेय या व्यक्तिरेखांसाठी मला अशी भाषा हवी होती जी आधी कधीच कुणी ऐकली नसेल. जिच्या वापरामुळे कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत. त्यामुळे मी या स्वतंत्र भाषेची निर्मिती केली. या निर्मितीमध्ये मी इंग्रजीसह विविध भाषांमधल्या अनेक व्याकरणाच्या नियमांचा, शब्दसंग्रहांचा आणि शब्दोच्चारांचा समावेश केला आहे. उदा. इंग्रजीत पीस अर्थात शांतता या शब्दासाठी किलीकीमध्ये इस्स्स असा शब्द तयार केला आहे.’
आपली प्रतिक्रिया द्या