पळपुटय़ा सरकारचा निषेध

18

सामना ऑनलाईन । नागपूर

राज्य सरकार विधिमंडळाच्या अधिवेशनात सर्व आघाडय़ांवर अपयशी ठरले असून राज्यातील शेतकऱयांच्या तोंडाला सरकारने पाने पुसली आहेत, असा सनसनाटी आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला. या पळपुटे सरकारचा आम्ही निषेध करतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

विधिमंडळाच्या अधिवेशनाचे सूप वाजल्यानंतर काँग्रेस कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सरकारच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करीत सरकारचा निषेध केला. विखे-पाटील म्हणाले, राज्यातील कायदा -सुव्यवस्था, मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी, गृहराज्यमंत्र्यांचा राजीनामा, १३०० शाळा बंद करण्याचा निर्णय, धान, सोयाबीन व अन्य शेतमालाला हमीभाव आदी उपस्थित प्रश्नांवर सरकार समाधानी उत्तर देऊ शकले नाही. बहुतांश प्रश्नांवर सरकार निरुत्तर झाले. हे सरकारचे अपयश आहे.

सर्वसामान्यांचे प्रश्न सुटावे याकरिता आम्ही तीन आठवडे अधिवेशन घेण्याची मागणी केली, मात्र सरकारने दोन आठवडय़ांत गुंडाळले. भ्रष्टाचाराची पाठराखण करणारे हे सरकार आहे हे या अधिवेशनातून दिसून आले. राज्यातील जनतेची फसवणूक करण्याचे काम सरकारने केले. शेतकऱयांचे प्रश्न सुटतील अशी अपेक्षा होती, मात्र त्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम सरकारने केले.

आपली प्रतिक्रिया द्या