उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांच्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई, अंगडिया प्रकरण भोवले

महाराष्ट्र शासनाने उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांच्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई सुरू करण्याचा निर्णय घेतला आहेत.

अंगडिया खंडणीप्रकरणी लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात त्याच पोलीस ठाण्यातील तिघा अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल झाल्यापासून उपायुक्त सौरभ त्रिपाठी फरार झाले आहेत. तेव्हापासून त्रिपाठी कोणतेही कारण न देता कामावर गैरहजर आहेत. शिवाय त्यांनी तक्रारदार अंगडियांवर दबावदेखील टाकला होता. त्यामुळे या बाबींचा विचार करता त्रिपाठी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी असा प्रस्ताव मुंबई पोलिसांकडून शासनाला पाठवण्यात आला होता. त्यानुसार महाराष्ट्र शासनाने त्यांच्याविरोधात शिस्तभंगाची कारवाई सुरू केली आहे.

भुलेश्वर येथील अंगडियांना आयकर विभागाच्या कारवाईची भीती दाखवत त्यांच्याकडून रोकड उकळल्याप्रकरणी दक्षिण प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त दिलीप सावंत यांच्या तक्रारीवरून लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्याचे निरीक्षक ओम वंगाटे, एपीआय नितीन कदम आणि उपनिरीक्षक समाधान जमदाडे यांच्याविरोधात त्याच पोलीस ठाण्यात खंडणी व रॉबरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी गुन्हे शाखेने कदम व जामदाडे या दोघा अधिकाऱ्यांना अटकदेखील केली. ही कारवाई होत असताना उपायुक्त सौरभ त्रिपाठी हे अचानक आजारपणाच्या सुट्टीवर गेले.

गुन्हे शाखा त्यांचाही जबाब नोंदवणार असे बोलले जात असतानाच आज सौरभ त्रिपाठी यांच्या बदलीचे आदेश काढण्यात आले. त्रिपाठी यांच्याकडे रिक्त असलेल्या अभियानचा पदभार सोपविण्यात आला आहे. तर ‘ल’ विभागाचे उपायुक्त शशीकुमार मीना यांच्याकडे परिमंडळ-2 चा तात्पुरता पदभार देण्यात आला आहे. मात्र या बदलीनंतर देखील त्रिपाठी कोणतेही योग्य कारण न देता कर्तव्यावर हजर झाले नसल्याने त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.