‘समृद्धी’विरोधी लढ्यात फूट पाडण्याचा सरकारचा डाव

10

सामना प्रतिनिधी । नाशिक

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी सिन्नर व इगतपुरी तालुक्यातील जमिनींच्या थेट खरेदीसाठी सरकारने प्रतिहेक्टरी कमीत कमी ४० लाख व जास्तीत जास्त ८४ लाख ७१ हजार रुपयांचा दर जाहीर केला आहे. जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली. जमिनी देण्यास विरोध करून समृद्धीच्या विरोधात लढा उभारणाऱ्या शेतकऱ्यांची दिशाभूल व्हावी व त्यांच्यात फूट पडावी यासाठी दरात मुद्दामहून दुजाभाव करून सरकारने हे षड्यंत्र रचल्याचा संताप व्यक्त होत आहे.

समृद्धी महामार्गासाठी सिन्नर व इगतपुरी तालुक्यातील ४९ गावांतील सुमारे चार हजार शेतकऱ्यांची १३०० हेक्टर जमीन जाणार आहे. याला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध करून लढा उभारला आहे. मोजणीसाठी आलेल्या शासकीय अधिकाऱ्यांना अनेकदा पिटाळून लावले आहे. हा विरोध शमविण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या ऐक्यात फूट पाडण्यासाठी सरकारने आता थेट जमीन खरेदीची योजना जाहीर केली. जिल्हास्तरीय समितीने निश्चित केलेल्या दराच्या पाचपट दर आज जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केला.

जाहीर दर
– इगतपुरी तालुक्यात नांदगाव सदोच्या ३२ हेक्टरसाठी ८४ लाख ४ हजार
– पिंप्री सदोच्या १४ हेक्टरसाठी सर्वाधिक ८४ लाख ६८ हजार प्रतिहेक्टरी
– सिन्नर तालुक्यात सावतामाळीनगरच्या ६ हेक्टरसाठी ८४ लाख ७१ हजार
– पांढुर्लीतील २२ हेक्टरला ८१ लाख
– आगासखिंडला २७ हेक्टरसाठी ७० लाख
– बेलूला २४ हेक्टरसाठी ७१ लाख प्रतिहेक्टरी
– सायाळे गावाच्या ३० हेक्टरसाठी सर्वात कमी ४० लाख ९९ हजार
– मलढोणच्या २३ हेक्टरसाठी ४१ लाख ९५ हजार
– फुलेनगरच्या २९ हेक्टरसाठी ४२ लाख ३४ हजार
– मऱहळ खुर्दच्या ३१ हेक्टरसाठी ४५ लाख १३ हजार
– मऱहळ बुद्रुकच्या ६६ हेक्टरसाठी ४६ लाख ९३ हजारांचा प्रतिहेक्टरी दर

शेतकऱ्यांची दिशाभूल
कमी क्षेत्र जाणार असलेल्या ठरावीक गावातील जमिनींना जास्तीच्या दराचे आमिष दाखविण्यात आले आहे तर जास्त क्षेत्र जाणाऱया जमिनींना मात्र कमी दर देऊन शेतकऱ्यांची दिशाभूल करण्यात आली आहे. दराच्या कमी-जास्तपणामुळे शेतकऱ्यांमध्ये फूट पडेल आणि जमिनी घेणे सोपे होईल असा हा डाव आहे.

इगतपुरी, सिन्नरमध्ये संताप
विरोधाची तीव्रता कमी होऊन समृद्धीविरोधी लढय़ात फूट पडावी यासाठी सरकारने मुद्दामहून एखाद्दुसऱया गावात तेही अत्यंत कमी क्षेत्रासाठी जास्तीचा दर देऊन दुजाभाव केला. हा डाव लक्षात आल्याने इगतपुरी आणि सिन्नर तालुक्यातील गावांमध्ये सायंकाळनंतर एकच खळबळ उडाली. बैठका सुरू झाल्या आणि हा लढा अधिक तीव्र करण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या