दि ग्रेट बॅरियर रिफ

<< भटकेगिरी>>    << द्वारकानाथ संझगिरी  [email protected] >>

वेस्ट इंडीजमधलं ऑण्टिगा, बार्बाडोस, मालदीवज किंवा ऑस्ट्रेलियाचं ग्रेट बॅरियर रिफ पाहिल्यावर देवावरचा माझा विश्वास दृढ होतो. तो समुद्र, त्या समुद्राच्या आतलं अद्भुत विश्व हे अपघाताने निर्माण झालं वगैरे पटतच नाही. मी देवळात जातो. देवावर श्रद्धा ठेवतो, तरी मी सश्रद्ध की निरीश्वरवादी हा संघर्ष मनात सुरू असतो. माझ्यातला विज्ञानवादी चटकन हार मानायला तयार नसतो. पण बॅरियर रिफसारखं काही पाहिलं की या डिझाइनमागे कुणाचं तरी डोकं, हात, कसब असावं असं वाटतं आणि मी ईश्वरवादी होतो. देवाने पहिला अवतार माशाचा घेतला आणि आता त्या अवताराची एवढी रूपं समुद्रात सापडतात की त्याची नोंद ठेवण्यात परमेश्वराचं ऑफिसही रिझर्व्ह बँकेप्रमाणे अकार्यक्षम ठरलं असेल. माणसाने जो प्रयत्न केला त्यात त्याला जाणवलं की त्या बॅरियर रिफमध्ये १५०० प्रजाती माशाच्या आहेत. तीस प्रकारचे नुसते व्हेल आणि डॉल्फिन आहेत. सतरा प्रकारचे समुद्रातले साप आहेत. सहा प्रकारची कासवं आहेत, खाऱ्या पाण्यातल्या मगरी आहेत. १२५ प्रकारचे शार्क, स्टिंग रे वगैरे आहेत. तिसऱ्यासारखे मोठे ‘क्लॅम्स’  किती आहेत देवजाणे. एक पाहिला, तेव्हा ‘जबडा’ या शब्दाचा नीट अर्थ मला कळला. कोटल्स असेच अफाट आहेत. २१५ प्रजातींचे १४ ते १७ लाख पक्षी तिथे विहार करतात. मुळात हे रिफ दोन हजार तीनशे किलोमीटर्स लांब आहे. त्याचं क्षेत्रफळ तीन लाख चव्वेचाळीस हजार चारशे स्क्वेअर किलोमीटर्स आहे आणि त्यात नऊशे बेटे आहेत. हे सर्व सांगायचं कारण इतकंच की हे सर्व पाहणं, त्याच्या खोलात शिरून आनंद घेणं हे एकाच काय, चारपाच जन्मांत होणारं काम नाही. आपण जे पाहतो हा समुद्राचा थेंब असतो किंवा भाताचं शीत असतं. पण हे असं शीत आहे, ज्यावरून भाताची थोडीतरी परीक्षा होते. आणि त्या निर्मितीच्या नायकाच्या नावाने हात जोडले जातात. त्या निर्मात्याला परमेश्वर म्हणा, निसर्ग म्हणा किंवा आणखी काही. व्यक्तिश: मी वेस्ट इंडीजमधलं ऑण्टिगा आणि मालदीव जास्त एन्जॉय केलं. कारण तिथे भरपूर वेळ होता. मालदीवला तर किनाऱ्याजवळ कमरेएवढ्या पाण्यात गेलं की आपण फिश टँकमध्ये उभे आहोत असं वाटतं. केर्न्स प्रचंड कमर्शियल आहे. केर्न्समध्ये एका मोठय़ा बोटीतून तुम्हाला एका बेटावर घेऊन जातात. पण तिथे जाऊन तळाला काच असलेल्या बोटीतून आणि पाणबुडीतून कोटल्स, मासे आणि जलचर पाहायचे. हवं असल्यास स्नॉरकेलिंग करायचं. जास्त उत्साही असाल तर स्क्यूबा डायव्हिंग, समुद्राच्या तळावरून चालणं वगैरे प्रकार करता येतात. खिशात भरपूर डॉलर्स खुळखुळत असतील, तर पॅरारोलिंग, हेलिकॉप्टर राईड वगैरे सुखसोयी उपलब्ध आहेत.

खरं सांगू, अशा ठिकाणी जाण्याचा योग्य काळ म्हणजे शरीर तरुण असणं आणि खिसा भरलेला असणं. सर्वसाधारणपणे मध्यमवर्गीय मराठी माणसाच्या आयुष्यात या गोष्टी एकत्रितपणे फार क्वचित येतात. त्यासाठी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला यायला हवं. पण परदेशात राहणारी आपली मुलं अलीकडे ही मजा करू शकतात. मी वेस्ट इंडीजमध्ये स्नॉरकेलिंग केलंय. इथेही करायचं होतं, पण चिरंजीव नको म्हणाले. कारण केर्न्सला या मोसमात, जेलीफिशने हैदोस घातलाय. ‘स्टिंग रे’ या माशाचाही धोका असतोच. तसे धोक्याचे फलक त्या बेटावरच्या किनाऱ्यावर लागले होते. त्याच्यापासून बचाव करणारे ‘सूटही’ भाड्याने मिळत होते. पण माझा मुलगा काही बाबतीत प्रचंड सावध आहे आणि त्याचं या विषयातलं ज्ञान हवं त्यापेक्षा अमळ जास्त आहे. तो मोठं क्रिकेट खेळत असता, तर आजच्या जमान्यातही वैयक्तिक तीनशे धावा केल्यानंतर त्याने ऑफस्टंपबाहेरचा चेंडू धोका हुंगून सुनील गावसकराप्रमाणे सोडला असता. स्टिंग रे हा पतंगासारखा मासा कमी खोल पाण्यात वाळूलगत असतो. त्याला चाकूसारखी शेपूट कम नांगी असते. निसर्गाने त्या माशाला दिलेला धारदार चाकूच समजा. ती नांगी घातक जखम करू शकते. ऑस्ट्रेलियात ब्रिस्बेनला एक जगप्रसिद्ध प्राणिसंग्रहालय आहे. ते स्टिव्ह आर्यविनच्या आईवडिलांनी उभारले. पण स्टिव्हने ते वाढवले. स्टिव्ह प्राण्यांमध्येच वाढला. एकदा पोहत असताना त्याचा पाय स्टिंग रेवर पडला. स्टिंग रेने दंश केला. ती त्या स्टिंग रेची नांगी थेट स्टिव्हच्या हृदयात घुसली. हृदय फाटलं. स्टिव्ह क्षणात गेला. जेली फिश तर पारदर्शक असतात. तो चावला की माणसाचा रक्तदाब वाढून त्याला हृदयविकाराचा धक्का येऊ शकतो. सबब, माझ्या मुलानेही स्नॉरकेलिंग केलं नाही आणि नातीलाही करू दिलं नाही. वडलांचं ज्ञान आता मुलीत झिरपतंय. त्यामुळे पाणबुडीत फिरताना तिने मला जेली फिश आणि निळय़ा ठिपक्याचा पिवळा स्टिंग रे आवर्जून दाखवला. मी उत्स्फूर्तपणे ‘ब्यूटिफुल’ म्हटले. ती पटकन म्हणाली, ‘ ‘ What is beautiful about it. Ajoba they look ugly” त्यानंतर विशेषणं मी जपून वापरायला लागलो.

काही ठिकाणी, ‘मगरीपासून धोका’ टाइपचे इशारे होते. लगेच चिरंजीवाने माझं समुद्रातल्या मगरीबद्दलचं ज्ञान अद्ययावत केलं. तो म्हणाला, ”बाबा, खाऱ्या पाण्यातल्या मगरी खूप मोठ्या असतात. त्या रानडुक्कर आणि म्हशीलाही ओढून घेऊन जातात. आपल्याकडे कोलकात्याजवळ सुंदरबनमध्ये त्या आहेत.” मला खेचून नेणं हे मगरीसाठी रिकामी बॅग खेचण्यापेक्षा मला लागणाऱ्या कष्टाहून कमी कष्टाचं आहे, याची जाणीव झाली. त्यामुळे मी चिरंजीवाचं ऐकलं. गोरी माणसं, काही चिनी माणसं हे सर्व धोके पचवून पोहत होती. स्नॉरकेलिंग करत होती. एकट्याने स्नॉरकेलिंग करू नका. एकत्रितपणे करा असं सांगण्यात येत होतं. पण काही मंडळी एकटीच स्नॉरकेलिंगच्या विश्वात मग्न होती. माशांना आणि गोऱ्या माणसांना पाण्याचं भय नाही, असं मला नेहमी वाटतं. नाहीतर कॅप्टन कूकसारखा माणूस ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड शोधू शकला नसता. कुठे इंग्लंड, कुठे ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड! दक्षिण आफ्रिकेच्या केप ऑफ गुडहोपला वळसा घालताना कितीतरी बोटी बुडल्या. कितीतरी माणसं मेली. तरीही वास्को द गामाने त्याला वळसा घातलाच. तो हिंदुस्थानात आला. ऑस्ट्रेलियन्स धैर्य पाहून शार्क माशांनाही आपल्याला आदर्श सापडला असं वाटत असावं. एकदा ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू सायमंडस आणि हेडन मासेमारीसाठी समुद्रात गेले. त्यांची बोट बुडाली. ते शार्क असलेल्या पाण्यातून पोहत तीन तासांनी किनाऱ्याला लागले. आम्ही टिपिकल सावध मराठी निर्णय घेतला. आधी पाणबुडीतून आणि मग तळाला काच असलेल्या बोटीतून समुद्राच्या पोटातलं जग पाहिलं. कोरल्स, शिंपले, मासे, वनस्पती, कासवं, साप सर्वांचं एकत्र नांदणं मस्त वाटलं. काही काही माशांचे रंग अद्भुत होते. जगातला सर्वोत्कृष्ट पेंटरही त्याची कल्पकता वापरून इतकं सुंदर माशाचं पेंटिंग करू शकला नसता. ऑस्ट्रेलियन शाळेतल्या प्रॅक्टिकल शिक्षणामुळे माझ्या नातीला समुद्राच्या या धनाची खूपच माहिती आहे याची मला जाणीव झाली. मी त्या वयाचा असताना मला पापलेट, बोंबिल, कोलंबी, बांगडे वगैरे सोडून माशांचं ज्ञान नव्हतं. आणि हे ज्ञान शाळेने नाही तर कोळणीने दिलं होतं. असो. पाणबुडीतून मासे पाहणं हा लाइफ टाइम अनुभव असतो. मी सुदैवाने तो दोनदा घेतला.

त्या बेटावर एक मगरींचं प्रायव्हेट संग्रहालय होतं. पापुआ गिनिजमधल्या एका गोऱ्या इसमाने मगरी, काही आर्टिफॅक्टस जमवले. त्यातून हे संग्रहालय साकार झालंय. ही गोरी माणसे काय काय उद्योग करतात? त्याचा मुलगा आता ते सांभाळतो. तिथे आम्ही दोन मगरी पाहिल्या. त्या खाऱ्या पाण्यातल्या होत्या. एवढी मोठी मगर मी यापूर्वी कधी पाहिली नव्हती. ती म्हैस काय गेंडा पण पाण्यात खेचून नेईल असं वाटलं. तिथे मगरींना जेवण खरं तर कोंबडी भरवण्याचा शो असतो. असा शो मी एकदा दक्षिण आफ्रिकेत सनसिटीत पाहिला होता. कोंबडीच्या तुकड्यासाठी मगर पाण्यावर लंबकासारखी उभी राहते. तिथे जाता जाता छोट्या मगरीबरोबर फोटो काढायची पण सोय होती. घरी दिवाणखान्यात लटकवायला तो चांगला फोटो होऊ शकतो.

बॅरियर रिफमध्ये जाऊन पाण्याला स्पर्श करायचा नाही? चिरंजीव, सून आणि बायको शॉपिंगमध्ये बिझी आहे, हे पाहून मी आणि नात पाण्यात शिरलो. मयूरपंखी पाणी, मोरपीस बनून गुदगुल्या करून गेली. नात प्रेमाने म्हणाली, ”आजोबा काळजी करू नको आपण पाण्यात खेळलो हे बाबांना नाही सांगणार?”

काय दिवस आहेत! मुलाला घाबरायचं आणि नातीने धीर द्यायचा.

 

आपली प्रतिक्रिया द्या