दोन मालवाहू जहाजांची भीषण टक्कर टळली

35

सामना ऑनलाईन । उरण

उरणच्या समुद्रात सोमवारी रात्री दोन अवाढव्य मालवाहू जहाजांची भीषण टक्कर टळली. कॅप्टनच्या बेपर्वाईमुळे भरसमुद्रात ही जहाजे एकमेकांना घासून पुढे गेली. हादरलेल्या या जहाजांवर सुदैवाने नाविकांनी वेळीच नियंत्रण मिळविल्याने मोठी दुर्घटना टळली. या थरारक घटनेने जेएनपीटी प्रशासन हादरून गेले असून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

सोमवारी रात्री ११ ते ११.३० च्या दरम्यान एमबीईएच चिनूक हे मालवाहू जहाज जेएनपीटी बंदरातून निघाले होते. त्याचवेळी हुंडाई कंपनीचे माल घेऊन येणारे करेज हे जहाज जेएनपीटीच्या दिशेने येत होते. मात्र बंदरापासून काही अंतरावरच भरसमुद्रात हे दोन्ही जहाज समोरासमोर आले. त्यामुळे जहाजांवरील कॅप्टनसह कर्मचाऱयांची एकच तारांबळ उडाली. सर्वांचेच धाबे दणाणले. साक्षात मृत्यूच समोर दिसू लागला, पण दोन्ही जहाजांवरील नाविकांनी चपळाई करत अचानक जहाजांची दिशा बदलली, परंतु त्यानंतरही हे दोन्ही जहाज एकमेकांना घासून पुढे गेले. या घटनेला डीजी शिपिंगच्या अधिकाऱयांनी दुजोरा दिला असून ही घटना नेमकी कशामुळे घडली याची चौकशी केली जात आहे.

आवाज आला.. घर्षणाने ठिणग्या उडाल्या

नाविकांनी जहाजांवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र  ही दोन्ही जहाजे अवाढव्य असल्याने एकमेकांना जोरदार घासली.  त्यामुळे जबरदस्त आवाज आला. हे घर्षण इतके भयंकर होते की अक्षरशः ठिणग्याच उडाल्या.

आपली प्रतिक्रिया द्या