Will Smeed 20 वर्षीय खेळाडूने इतिहास रचला, ‘द हंड्रेड’मध्ये शतक ठोकणारा पहिला खेळाडू ठरला

क्रिकेटमध्ये बरेच विक्रम होत असतात. मात्र काही विक्रम खास असतात जे कायम लक्षात राहतात. असाच एक विक्रम 20 वर्षीय खेळाडूने केला आहे. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या ‘द हंड्रेड’ या पुरुषांच्या स्पर्धेमध्ये विल समिद (Will Smeed) नावाच्या खेळाडूने शतक ठोकत इतिहासामध्ये सुवर्णअक्षरांनी आपल्या नावाची नोंद केली आहे.

‘द हंड्रेड’ या स्पर्धेचे खास वैशिष्ट्य म्हणजे यात दोन्ही संघांना 100 चेंडू खेळायला मिलतात. टी-20 आणि टी-10 स्पर्धेच्या मधला हा प्रकार आहे. कमी चेंडू असल्याने या स्पर्धेत अर्धशतक ठोकणेही अवघड असते. जोस बटलर, लियाम लिव्हिंग्स्टोन, जॉनी बेअरस्टो आणि मोईन अलीसारखे दिग्गज ही स्पर्धा खेळतात. त्यांनाही अद्याप शतकी खेळी साकारता आलेली नाही. परंतु एका नवख्या खेळाडूने हा कारनामा करून दाखवत क्रीडाप्रेमींचे लक्ष वेधले आहे.

बुधवारी 10 ऑगस्टला खेळलेल्या गेलेल्या लढतीमध्ये विल समिद (Will Smeed) याने नाबाद शतकी खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. विशेष म्हणजे ‘द हंड्रेड’ या पुरुषांच्या स्पर्धेमध्ये शतक ठोकणारा पहिला खेळाडू होण्याचा मान त्याने मिळवला. त्याच्या तडाखेबाज खेळीचे क्रीडा क्षेत्रातून कौतुक होत आहे.

बर्मिंगहॅम फोनिक्स आणि सदर्न ब्रेव यांच्या लढतीदरम्यान विल समिद याने शतक ठोकले. हा सामना बर्मिंगहॅम फोनिक्सने 53 धावांनी जिंकला. बर्मिंगहॅम फोनिक्सकडून खेळताना सलामिला आलेल्या विल समिद याने 50 चेंडूत 101 धावांची नाबाद खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने 6 उत्तुंग षटकार आणि 8 चौकारांची आतषबाजी केली. 202 च्या स्ट्राईकरेटने त्याने या धावा चोपल्या.

ब्रुक्सचा ‘पंच’

विल समिदच्या शतकी खेळीच्या जोरावर बर्मिंगहॅम फोनिक्सने प्रथम फलंदाजी करताना 4 विकेट्स गमावून 176 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना सदर्न ब्रेवचा संघ 123 धावांमध्ये गारद झाली. बर्मिंगहॅम फोनिक्सकडून वेगवान गोलंदाज हेन्री ब्रुक्स याने 25 धावा देऊन 5 विकेट्स घेतल्या.