‘द काश्मीर फाइल्स’वर IAS अधिकाऱ्याचे वादग्रस्त ट्विट, सरकार नोटीस बजावणार

‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खुद्द या चित्रपटाची बाजू खासदारांसमोर मांडली आहे. त्यानंतर या चित्रपटासंदर्भात विविध स्तरावर चर्चा होत आहेत. दरम्यान, मध्य प्रदेशात एक नवीन प्रकरण समोर आले आहे. मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी म्हटले आहे की, नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटावर वादग्रस्त ट्विट करणाऱ्या प्रशासकीय सेवा (आयएएस) अधिकारी नियाज खान यांना राज्य सरकार कारणे दाखवा नोटीस बजावणार आहे. गेल्या आठवड्यात राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपसचिव नियाज खान (50) यांनी एका ट्विटमध्ये ‘द कश्मीर फाइल्स’च्या निर्मात्यांना सांगितले होते की, देशातील अनेक राज्यांमध्ये झालेल्या मुस्लिमांच्या सामूहिक हत्याकांडावरही एक चित्रपट बनवावा. ते म्हणाले की, ‘मुस्लिम हे कीटक नाहीत, तर मानव आणि देशाचे नागरिक आहेत.’

मिश्रा यांनी बुधवारी येथे पत्रकारांना सांगितले की, मी खान यांचे ट्विट पाहिले आहे. हा एक गंभीर मुद्दा आहे. ते (सरकारी) अधिकाऱ्यांसाठी निर्धारित लक्ष्मण रेखा (सीमा) ओलांडत आहेत… राज्य सरकार त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावेल आणि त्यांची उत्तरे मागवेल.” खान म्हणाले की, वेगवेगळ्या प्रसंगी मुस्लिमांचे हत्याकांड दाखवण्यासाठी एक पुस्तक लिहिण्याचा त्यांचा विचार होता जेणेकरून ‘द काश्मीर फाइल्स’ प्रमाणे अन्य कुणी त्यावर चित्रपट बनवेल. यावरही एक चित्रपट तयार करून अल्पसंख्याकांच्या वेदना देशातील नागरिकांसमोर आणता येतील.

याशिवाय, खान यांनी ‘द कश्मीर फाइल्स’च्या निर्मात्यांना चित्रपटातून मिळणारी संपूर्ण रक्कम कश्मिरी पंडितांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आणि कश्मीरमध्ये त्यांच्यासाठी घरे बांधण्यासाठी दान करण्याचे आवाहन केले आणि ते म्हणाले की ही एक मोठी सेवा असेल. खान यांचे ट्विट व्हायरल झाल्यानंतर, चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी 25 मार्च रोजी भोपाळमध्ये खान यांच्याशी विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी भेटीची वेळ मागितली आहे. राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री सारंग यांनी रविवारी सांगितले की ते खान यांच्या विरोधात कार्मिक विभागाला पत्र लिहिणार आहेत आणि आयएएस अधिकारी सांप्रदायिकतेवर बोलत असल्याचा आरोप केला.

‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट अभिषेक अग्रवाल निर्मित असून विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित आहे. हा चित्रपट 1990 च्या दशकात कश्मीर खोऱ्यातून कश्मिरी पंडितांवरील अन्याय आणि नरसंहारावर आधारित आहे. हा चित्रपट 11 मार्च रोजी प्रदर्शित झाला आहे. यात अनुपम खेर, पल्लवी जोशी आणि मिथुन चक्रवर्ती यांच्या प्रमुख भूमिका आहेत. मध्य प्रदेश आणि गुजरातसह काही भारतीय जनता पक्ष (भाजप) शासित राज्यांनी चित्रपट करमुक्त केला आहे.