बाप्पा मंडपाकडे निघाल्यानंतर पालिकेची ‘खड्डेमुक्ती’ला सुरुवात, 15 ऑगस्टपासून काम करणार

सर्वांचा लाडका गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आल्यामुळे बड्या मंडळांच्या मोठमोठ्या गणेशमूर्ती मंडपांकडे जाण्यास सुरुवात झाल्यानंतर आता पालिकेला बाप्पाच्या आगमन मार्गातील खड्ड्यांची आठवण झाली आहे. बाप्पाचा प्रवास सुरळीत होण्यासाठी पालिका 15 ऑगस्टपासून लालबाग-परळ आदी मार्गातील रस्त्यांवरील खड्ड्यांची दुरुस्ती करणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून झालेल्या जोरदार पावसामुळे रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. त्यामुळे पालिकेकडे दररोज खड्ड्यांबाबत शेकडो तक्रारी येत आहेत. यामध्ये गणेशमूर्ती बनणाऱ्या लालबाग-परळ विभागातील खड्ड्यांचा प्रश्न सर्वाधिक ऐरणीवर आला आहे. शिवाय गणेशमूर्ती आगमन मार्गात काही ठिकाणी झाडांच्या फांद्याही आहेत. यातच काही दिवसांवर गणेशोत्सव आल्याने मूर्ती मंडपाकडे जाण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे गणेशभक्तांकडून बाप्पाच्या आगमन मार्गातील खड्डे बुजवण्याची मागणी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेकडून 15 ऑगस्टपासून खड्डे बुजवण्याचे काम वेगाने करण्यात येईल, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली. सद्यस्थितीत पाऊसही थांबून थांबून राहत असल्यामुळे खड्डे बुजवणे सोयिस्कर ठरणार असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे.

13 अभियंत्यांकडून खुलासे

रस्त्यांच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष केल्याचे समोर आल्यामुळे पालिकेकडून आपल्या संबंधित इंजिनीयरवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. याबाबत संबंधित विभागाच्या अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून प्रशासनाने खुलासे मागविले होते. अशा 13 अभियंत्यांचे खुलासे प्रशासनाला प्राप्त झाले असून त्यावर लवकरच पुढील कार्यवाही केली जाईल, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली