लोप पावत असलेल्या शास्त्रीय संगीताला नवी उभारी देण्याची गरज- कविता कृष्णमूर्ती

51


सामना प्रतिनिधी । नांदेड

शास्त्रीय संगीत हा संगीताचा मूळ पाया असून, आजकालच्या काळात पाश्चिमात्य संगीताच्या माध्यमातून वेगवेगळे प्रयोग होत असतात. मात्र ते क्षणिक असतात. त्यामुळे लुप्त पावत असलेल्या शास्त्रीय संगीताचा अभ्यास आता प्रत्येक शाळेतून झालाच पाहिजे. जेणेकरुन विद्यार्थ्यांना संगीताची आवड निर्माण होईलच, त्यासोबत वेगवेगळ्या रागांची ओळख होवून त्यातून संगीताचा विकास आणि प्रचार चांगल्या पध्दतीने होवू शकेल, अशी भूमिका प्रख्यात गायिका कविता कृष्णमूर्ती यांनी येथे दै. ‘सामना’शी बोलताना मांडली.

तब्बल तीन दशके भक्तीसंगीत, चित्रपट संगीत आणि भावगितांच्या माध्यमातून देशभरातील रसिकांच्या मनात घर केलेल्या आणि प्रसिध्द झालेल्या कविता कृष्णमूर्ती यांचे आज नांदेड येथे आगमन झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. हल्लीच्या काळात काही विशिष्ट प्रदेशाच्या संगीताचे प्रदर्शन बॉलीवूडमध्ये होताना दिसून येते. एका विशिष्ट दर्जाचा प्रभाव यावर आहे. इतर राज्यात ज्या प्रमाणे कर्नाटक, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, महाराष्ट्र या राज्यातील संगीत ज्यांचा देशभरातील गायिकीवर चांगला प्रभाव असताना त्या राज्यातील संगीत फारसे पुढे येत नाही. पाश्चिमात्य संगीताच्या माध्यमातून हल्ली तरुण पिढी वाहवत जात आहे. मात्र हे संगीत क्षणीक असते. फार काळ त्याचा प्रभाव राहू शकत नाही. वेगवेगळ्या कार्यक्रमात आता भरतनाट्यम किंवा शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम होताना दिसून येत नाहीत. विशेषतः महाविद्यालय व शाळा यामध्ये होणारे कार्यक्रम नजरेखालून घातले त्याची प्रचिती येते. एखाद्या कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदन भरतनाट्यमच्या नृत्याने व्हायची मात्र हल्ली पॉप संगीत आणि पाश्चिमात्य संगीताच्या माध्यमातून अशा कार्यक्रमाची सुरुवात होताना दिसते. तरुण पिढी देखील त्यामागेच जाताना आपल्याला दिसून येते. मात्र शास्त्रीय संगीत हा संगीताचा मूळ पाया आहे. रुढ असलेल्या गाण्यांसोबत शास्त्रीय संगीताची जोड देवून शालेय विद्यार्थ्यांना त्याची आवड निर्माण करण्याची गरज असल्याचे कविता कृष्णमूर्ती म्हणाल्या.

हल्लीच्या चित्रपटात भक्तीगितांचा अभाव असल्यामुळे जुन्या चित्रपटातील वेगवेगळ्या भक्तीगितांची आठवण आजही रसिकांना होत असते. मात्र हल्लीच्या चित्रपटातील गाणी यातून दूर गेल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. संगीत रामायण आणि महाभारत हे नव्या पिढीला चांगल्या आणि सोप्या पध्दतीने समजावून सांगण्यासाठी संगीताचा आविष्कार त्याला जोडल्यास व त्याची महती समजून घेताना वेगवेगळ्या गायकांचा संच निर्माण करुन त्यातून यावर आधारीत असलेली गीते सादर केल्यास रामायण आणि महाभारत नव्या पिढीला चांगल्या पध्दतीने समजू शकेल. त्यामुळे अशा प्रयोगांची आज आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक शाळेतून संगीत हे आता आवश्यक केले पाहिजे. याचा पुनरुच्चार करुन शास्त्रीय संगीतावर आधारीत वेगवेगळ्या रागांची ओळख नव्या पिढीला प्रामुख्याने शालेय वर्गात असलेल्या विद्याथ्र्यांना करुन दिल्यास शास्त्रीय संगीताचा एक मोठा वर्ग यातून निर्माण होईल. रुढ असलेली गाणी आणि त्यासोबतच त्याला शास्त्रीय संगीताची साथ व त्या माध्यमातून शास्त्रीय संगीताचे धडे शिकविलेच पाहिजे. शास्त्रीय संगीत लोप पावत असताना प्रत्येक शाळांमध्ये आता त्याची गरज निर्माण झाली असून, त्यासाठी कुणी पुढाकार घेतल्यास प्रत्येक शहरातून एका शाळेला आपण यासाठी सहकार्य करु व त्यासाठी पुढाकारही घेवू, अशी भूमिकाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

आपली प्रतिक्रिया द्या