नगरमध्ये 45 वर्षाच्या पुढील नागरिकांना उद्यापासून दिला जाणार डोस

लस देण्यासाठी सर्वत्र गर्दी होत असते. त्यामुळे गर्दी होऊ नये याकरिता योग्य पद्धतीने नियोजन करण्यासाठी नगर महानगरपालिकेने आता ज्यांना डोस दिला जाणार आहे अशांची यादी महानगरपालिकेच्या वेबसाईटवर तसेच संबंधित केंद्राबाहेर लावण्याचा निर्णय उद्या 12 तारखेपासून घेण्यात आला असल्याची माहिती महानगरपालिकेचे महापौर बाबासाहेब वाकळे व आयुक्त शंकर गोरे, आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल बोरगे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. अशा प्रकारची यादी प्रसिद्ध करणारी ही राज्यातील पहिलीच महानगरपालिका ठरणार आहे.

नगर महानगरपालिकेने उद्या दि. 12 रोजी कोविशील्ड लशीचा दुसरा डोस पंचेचाळीस वर्षावरील नागरिकांना दिला जाणार आहे. याकरिता पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांची यादी त्यांनी घेतलेल्या पहिल्या डोसच्या दिनांकानुसार प्राधान्यक्रमाने निश्चित करण्यात आलेली आहे. ही यादी संबंधित आरोग्य केंद्रांमध्ये प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ज्या नागरिकांचे नाव यादीमध्ये असेल त्यांनी त्या लसीकरण केंद्रावर लस घेण्याकरिता उपस्थित राहायचे आहे. उपलब्धतेनुसार सर्वांचे लसीकरण पूर्ण करून घेतले जाईल, तरी नागरिकांनी विनाकारण आरोग्य केंद्रावर गर्दी करू नये, असे आवाहन आरोग्य अधिकारी डॉ. बोरगे यांनी केले आहे.

तसेच महानगरपालिकेच्या वेबसाईटवर ज्यांची लस घ्यायची राहिली आहे त्यांची यादी प्रसिद्ध केली जाईल, असेही आयुक्तांनी सांगितले आहे. आम्ही ज्या ज्या वेळेला जो डोस देणार आहोत त्याची माहिती आदल्या दिवशी प्रसिद्ध केली जाणार आहे, त्यामुळे इतरांनी केंद्रावर जाऊन गर्दी करू नये, अशीही सूचना करण्यात आली आहे. तसेच येत्या दोन दिवसांमध्ये लशीसंदर्भात एक टोल फ्री क्रमांकसुद्धा आम्ही निश्चित करणार आहोत. ज्या नागरिकांना चौकशी करायची असेल तर त्यांनी त्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधायचा आहे. नगर शहरामध्ये आम्ही सात केंद्र निश्चित केलेले आहेत, अशी माहिती आयुक्त गोरे यांनी सांगितले.

नगर शहरामध्ये तोफखाना आरोग्य केंद्र, जिजामाता नागरी आरोग्य केंद्र, मुकुंद नगर नागरी आरोग्य केंद्र ,केडगाव नागरी आरोग्य केंद्र ,महात्मा फुले नागरी आरोग्य केंद्र, सिव्हिल आरोग्य केंद्र नागापूर आरोग्य केंद्र या ठिकाणी उद्यापासून म्हणजे दि. 12 तारखेपासून दुसरा डोस दिला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
लसीकरणाबाबत सुसूत्रता आणणारी आणि परिपूर्ण अंमलबजावणी करणारी ही राज्यातील पहिलीच महानगरपालिका आहे, असे मतही आयुक्तांनी व्यक्त केले.

आपली प्रतिक्रिया द्या