अहमदपूर तालुक्यात कोरोनाचा हाहा:कार; अनेक गावे हॉटस्पॉट, रुग्ण संख्या झपाट्याने वाढली

अहमदपूर शहरासह तालुक्यात कोरोनाने हाहा:कार उडवला असून अनेक गावे हॉटस्पॉट बनलेली आहेत. रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे तर शहरासह तालुक्यातही मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. शनिवारी शहरात 170 तर ग्रामीण भागात 337 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. आज ग्रामीण रुग्णालयात लसीचे डोस फक्त 30 ते 35 शिल्लक असल्याचे समजले आहे.

या तालुक्यात मरशिवणी येथील समाज कल्याणच्या शाळेत सुरू असलेल्या कोरोना सेंटरमध्ये सध्या 54 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर या तालुक्यात अनेक गावे सध्या हॉटस्पॉट झालेले विदारक चित्र पहावयास मिळते आहे. यामध्ये शिरूर ताजबंद येथे 300 पेक्षा जास्त रुग्णसंख्या, हाडोळती 100 च्या पुढे थोडगावाडी 115 रुग्णाच्या पुढे, कीनगाव 70 ते 80 रुग्ण, हिप्परगा 70 ते 80, सताळा 70 ते 80 रुग्ण, सोरा, चिखली, खंडाळी ही गावे पण हॉटस्पॉट, अंधोरी 100 पेक्षा जास्त, सुनेगाव शेंद्री 58, ढाळेगाव 20, याप्रमाणे तालुक्यात सर्व गावांमध्ये कमी-जास्त प्रमाणात कोरोनाचे रुग्ण वाढलेले आहेत.

शहरातील दोन खासगी रुग्णालयात सध्या कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. येथे रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे बेड उपलब्ध होत नाहीत. तसेच रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढलेले दिसत आहे. शनिवार आणि रविवार या शहरातील मेडिकल दुकाने, दवाखाने व बँकांचे व्यवहार वगळता सर्व व्यवहार कडक बंद करण्यात आलेले आहेत. तरीही शहरात अनेक लोक रस्त्यावर फिरताना दिसत आहेत तर काहीजण पोलिसांची नजर चुकवून गल्ली बाळाने चोरून फिरताना दिसत आहेत.

शहरात अनेक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण चक्क रस्त्याने फिरताना दिसत आहेत. यामुळे शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढताना दिसत आहे, तर पोलीस चौकांमध्ये थांबलेले आहेत. यामुळे पोलिसांकडून त्यांना शिक्षा देण्यात येत आहे. आज सकाळी साडेदहानंतर त्यांची रॅपिड टेस्ट केली असता यामध्ये तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये तर एक ग्रामसेवक पॉझिटिव्ह सापडला आहे.
नगरपरिषदेने शहरात स्वच्छतेच्या बाबतीत काळजी घेणे गरजेचे आहे. याकरिता घरोघरी जाऊन ऑक्सीमीटरने तपासणी सुरू करण्यास सुरुवात केली आहे. येथे डुकरांचा प्रादुर्भाव खूप वाढलेला आहे. प्रत्येक प्रभागात लहान डुकरांची पिल्ले आणून सोडली जातात व ती मोठी झाली की त्याला पकडून नेले जाते, यामुळे शहरात वर्षाचे बारा महिने डुकरांचा सुळसुळाट पाहायला मिळत आहे. म्हणून शहरात स्वच्छता राहत नाही. डुकरांच्या मालकांना बोलावून त्याचा बंदोबस्त करणे महत्त्वाचे आहे.
आज ग्रामीण रुग्णालयात फक्त 30 ते 35 लसीचे डोस शिल्लक असल्याचे समजले. लस त्वरित मागून घेणे व नागरिकांना मोठ्या प्रमाणात लसीचे डोस देणे महत्त्वाचे आहे. सध्या लसीचा तुटवडा असल्यामुळे दुसरा लसीचा डोस 45 दिवसांनंतर घेण्याबाबत डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या