पालिकेच्या इंग्रजी माध्यमातील विद्यार्थी संख्या घटली, प्रशासनाचे दुर्लक्ष

30

सामना प्रतिनिधी, धुळे

महापालिका शिक्षण मंडळाने मोठया उत्साहात सुरु केलेल्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे आता शिक्षण मंडळ आणि महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे. इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांना गणवेश आणि शैक्षणिक साहित्य वेळीच दिले जात नसल्याने अनेक विद्यार्थ्यांनी शाळेतून काढता पाय घेतला आहे. यंदा विद्यार्थ्यांची संख्या घटली असून परिस्थिती पूर्ववत होण्यासाठी शिक्षण मंडळ आणि महापालिका प्रशासनाने लक्ष घालावे अशी अपेक्षा शिक्षकांची आहे.

बदलत्या परिस्थितीत अनेक मध्यमवर्गीय पालक मुलांना इंग्रजी माध्यमात शिकवु लागले. बहुसंख्य इंग्रजी माध्यमातल्या शाळा खासगी असल्याने या शाळांचे शुल्क आकारणे शहरातील मध्यमवर्गीयांना अशक्य होते. अशा परिस्थितीत सभापती संदीप महाले यांनी शिक्षण मंडळाच्या माध्यमातुन इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरु करायच्या आणि मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातील शिक्षणाची संधी उपलब्ध करुन दिली. मराठी माध्यमातील विद्यार्थी संख्या रोडावल्याने ओस पडलेल्या वर्गामध्ये इंग्रजी माध्यमाचे वर्ग सुरु झाले. या वर्गातील विद्यार्थ्यांना द्यावयाच्या सुविधा, शिक्षकांना द्यावयाचे मानधन यासाठी सभापती संदीप महाले यांनी काही प्रमाणात पदरमोड केली. कालांतराने महापालिकेकडून मिळणाऱया अनुदानात घट झाली किंवा अनुदान वेळेत मिळत नसल्याचे अनुभव आले. साहजिकच शिक्षण मंडळाच्या नियंत्रणात सुरु असलेल्या चार इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या रोडावली. शिक्षण मंडळ आणि महापालिकेने विद्यार्थ्यांचे नुकसान होवू नये म्हणुन लक्ष घालावे अशी अपेक्षा आता पालक व्यक्त करु लागले आहेत.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान
या शाळांना महापालिकेचे मिळणारे अनुदान कालांतराने बंद झाले. तसेच शाळा सुरु होवून बरेच दिवस झाले तरी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके, गणवेश, शालेय साहित्य मिळालेले नाही. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांनी शिक्षण कसे घ्यायचे या विवंचनेत पालक आहेत. तर हे शैक्षणिक नुकसान टाळावे यासाठी प्रशासनाने लक्ष घालण्याची मागणी पालक करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या