तब्बल ९ वर्षानंतर पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

22

सामना प्रतिनिधी । कवठे येमाई (पुणे)

पुण्यातील कवठे येमाईच्या दाभाडे वस्तीवर नऊ वर्षांपूर्वी दरोडा टाकून फरारी झालेला आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. सुधीर निजाम काळे असं या अट्टल गुन्हेगाराचं नाव आहे. पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेनं ही महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे.

पुणे जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कवठे येमाई येथे २००९ साली बबन दाभाडे यांनी दरोड्याच्या घटनेची फिर्याद शिरुर पोलीस स्टेशनला नोंदविली होती. चोरट्यांनी घराची खिडकी तोडून घरात प्रवेश करुन घराचा मुख्य दरवाजा उघडला होता. यावेळी घराबाहेर झोपलेल्या फिर्यादीचे वडील बापू व आई विठाबाई, बहिण ताराबाई यांना लोखंडी गजाने मारहान करत जबर जखमी केले होते. त्यांच्याजवळील ४ तोळे सोन्याचे दागिने, दोन गंठण, कर्णफुले, रोख रक्कम दहा हजार रुपये घेऊन चोर पसार झाले होते.

या प्रकरणी पुणे ग्रामीण गुन्हे शाखा व शिरुर पोलीस या दरोड्यातील आरोपींचा शोध घेत होते. अखेर यातील सुधीर निजाम काळे यास गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने अटक केली. हा आरोपी तब्बल नऊ वर्षांपासून फरार होता. त्याच्यावर शिक्रापूर, लोणीकंद, कर्जत, श्रीगोंदा, शिरुर आदी पोलीस स्टेशनवर गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. आरोपीकडून आणखी गुन्हे उघडकीस होण्याची शक्यता आहे.

आपली प्रतिक्रिया द्या