केईएममधील रुग्णांच्या समस्या सुटणार, शिव आरोग्य सेनेने घेतली अधिष्ठात्यांची भेट 

अत्यंत माफक दरात अत्याधुनिक उपचार देणाऱया मुंबई महापालिकेच्या परळमधील केईएम रुग्णालयात मुंबईसह देशभरातून रुग्ण येत असतात. मात्र हजारो रुग्णांना आणि नातेवाईकांना येणाऱया समस्या तत्काळ सोडवून त्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी शिव आरोग्य सेनेचे महाराष्ट्र राज्य समन्वयक जितेंद्र सकपाळ यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज केईएमच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांच्याकडे केली. त्यावर रुग्ण आणि कर्मचाऱयांशी संबंधित सर्व समस्या तातडीने सोडवल्या जातील, असे आश्वासन अधिष्ठातांनी दिले.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिव आरोग्य सेनेच्या अध्यक्षा डॉ. शुभा राऊळ, कार्याध्यक्ष डॉ. किशोर ठाणेकर यांच्या सूचनेनुसार शिव आरोग्य सेनेचे महाराष्ट्र राज्य समन्वयक जितेंद्र सकपाळ यांनी संघटनेच्या पदाधिकाऱयांसह केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत आणि सीनियर एएमओ डॉ. प्रवीण बांगर यांची भेट घेतली. यावेळी एमआरआय व सिटी स्कॅन मशीनबद्दल रुग्णांना येणाऱया अडचणी, शस्त्र क्रियेसाठी लवकर न मिळणाऱया तारखा, रक्तपेढीमध्ये येणाऱया अडचणी, सोनोग्राफी मशीन एकच असल्यामुळे रुग्णालयामध्ये शिकाऊ डॉक्टर व कर्मचारी यांच्याकडून रुग्णांना मिळणारी वागणूक याबद्दल असलेल्या तक्रारी आणि समस्यांवर ठोस कारवाई करण्याची मागणी शिष्टमंडळाने केली. यावेळी संघटनेचे पॅरामेडिकल विभागाच्या महाराष्ट्र अध्यक्षा डॉ. गौरी कोठारे, माजी नगरसेविका ज्योती भोसले, डॉक्टर सेलच्या ईशान्य मुंबई अध्यक्षा डॉ. शारिवा रणदिवे, अमोल वंजारे, सुप्रिया ठोंबरे-पाटणे, शिवाजी झोरे, विनायक कानसकर, मयूर वाटाबळे, सिद्धेश मोहिरे, रुग्णसेवक प्रदीप मोगरे, राजा झगडे, लितेश केरकर, साक्षत म्हात्रे, किशोर भिलारे, मोहम्मद शेख आदी उपस्थित होते.