बनावट सालारजंगने विकली कोट्यवधींची मालमत्ता

37

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

तत्कालीन निजाम सरकारच्या सालारजंग इस्टेटची बनावट कागदपत्रे तयार करून जमिनी हडप करणाऱ्या टोळीच्या म्होरक्यास आज गुरुवारी आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली. त्याच्या घरावर व सालारजंगच्या कथित कार्यालयावर छापे मारून पोलिसांनी सालारजंगच्या कथित मालमत्तेची कागदपत्रे, संगणक, लॅपटॉप, ३२ रबरी शिक्के आदी साहित्य जप्त केले. या टोळीचे नेटवर्क शहरभर असून, या म्होरक्यासाठी काम करणाऱ्या साथीदारांनाही पोलिसांनी रडारवर घेतले आहे. दरम्यान, न्यायालयाने म्होरक्या मोहंमद नसिरोद्दीन मोहंमद उस्मानोद्दीन यास चार दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.

संभाजीनगरातील मोक्याच्या जमिनी तसेच कोट्यवधी रुपये किमतीच्या शासकीय जमिनी हडप करणारी सालारजंगच्या बनावट वंशजाची टोळीच अनेक वर्षांपासून शहरात कार्यरत आहे. सालारजंग ३ यांच्याशी संबंधित मीर महेमूद अली खान बशारत अली खान यांच्या नावाचे २०१४ मध्ये बनावट मुखत्यारपत्र तयार करून रोशन गेट येथील मोहंमद नसिरोद्दीन हा शहरातील मोक्याच्या जमिनींची विक्री करत असल्याची तक्रार पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्याकडे करण्यात आली होती. यावरून आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीकांत नवले यांच्या पथकाने आज सकाळी नसिरोद्दीन याच्या अमोदी कॉम्प्लेक्समधील घरावर आणि रोशन गेट येथील कार्यालयावर छापे मारून नसिरोद्दीन यास अटक केली. या प्रकरणी जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

बनावट कागदपत्रांआधारे केला दोन कोटींचा व्यवहार
रोशन गेट येथे सालारजंग वंशजाचे बनावट जीपीए तयार करून नसिरोद्दीन याने साथीदारांच्या मदतीने बायजीपुरा, समर्थनगर, सावरकर चौक, वरद गणेश मंदिर, हॉटेल देवप्रिया, कुशलनगर, पाटीदार भवन, रोशन गेट जिनिंग फॅक्टरी परिसरातील दोन एकर जागेसह शहरातील १२ मोक्याच्या जागांचा सौदा केला. यात त्याने दोन कोटींचा व्यवहार केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. शासकीय ज्ञान-विज्ञान महाविद्यालयाच्या जागेवर शेड मारून जागा हडप करण्याचा प्रयत्न करत असताना त्यास बेगमपुरा पोलिसांनी अटक केली होती. तसेच या टोळीने पोलिसांना हाताशी धरून चक्क जिन्सी ठाण्यासमोरील कृषी उत्पन्न बाजार समितीची ९ एकर जागाही हडप करण्याचा प्रयत्न केला होता. तसेच या कागदपत्रांआधारे या टोळीने बाजार समितीच्या गोडाऊनवर कब्जाही केलेला आहे. ही टोळी सालारजंगच्या नावाने सरकारी जमिनी हडप करत असल्याचे समोर आल्याने सालारजंगच्या वारसांनी पोलीस आयुक्तांकडे नसिरोद्दीन याची तक्रारसुद्धा केली होती.

आलू-बटाट्याचे ३२ शिक्के जप्त
सालारजंग वंशजाच्या तक्रारीपूर्वीपासूनच विविध पोलीस ठाण्यांत नसिरोद्दीन याच्याविरुद्ध अनेक गुन्हे दाखल आहेत. पोलीस त्याच्या मागावर होतेच. सालारजंग यांच्या वंशजाने तक्रार देताच आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज सकाळी रोशन गेट आणि सेंट्रल नाका येथील अमोदी कॉम्प्लेक्सवर छापा मारून लॅपटॉप, संगणक, दोन पोती बनावट कागदपत्रे, बटाट्यापासून केलेले ३२ शिक्के असा मुद्देमाल जप्त केला. नसिरोद्दीन याला अटक झाल्याचे कळताच त्याच्या साथीदारांनी शहरातून पळ काढला.

आपली प्रतिक्रिया द्या