रशियात श्रीमंतांना द्यावा लागणार जादा टॅक्स

रशियातील श्रीमंतांकडून जादा कर आकारणी करण्यात येणार आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेन युद्धादरम्यान निधी उभारण्यासाठी देशातील श्रीमंतांवर जास्त कर आकारण्याच्या विधेयकावर स्वाक्षरी केली. पुतीन यांच्या सहीनंतर श्रीमंतांवर जास्त कर लादण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. रशियातील 24 लाख रुबल (27,500 डॉलर) पर्यंतच्या उत्पन्नावर हा कायदा 13 टक्के कराची तरतूद करतो. पण त्याहून अधिक उत्पन्नावर अधिक कर आकारण्यात येणार आहे. 50 दशलक्ष रुबल (डॉलर 573,000) पेक्षा जास्त उत्पन्नासाठी कमाल दर 22 टक्के असेल. यासंबंधीचे विधेयक दोन दिवसांपूर्वीच रशियन संसदेने मंजूर केले होते. संसदेचे कनिष्ठ सभागृह ‘स्टेट डय़ूमा’ आणि वरिष्ठ सभागृह ‘फेडरेशन कौन्सिल’ यांनी हे विधेयक मंजूर केले. 2001 मध्ये रशियात लागू करण्यात आलेल्या समान दराने दीर्घकाळ महसूल संकलन वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या विधेयकात कंपन्यांसाठी प्राप्तिकराचा दर 20 टक्क्यांवरून 25 टक्के करण्याची तरतूद आहे.