वयाच्या 71 व्या वर्षीही तंदुरुस्त आहेत ‘या’ आजी; दररोज 3 तास करतात व्यायाम

सध्याच्या धकाधकीच्या आणि ताणतणावाच्या जीवनशैलीमुळे चाळिशी ओलांडल्यानंतर अनेक आजारांचा सामना करावा लागतो. तसेच सुस्ती आणि अशक्तपणाही जाणवतो. मात्र, अमेरिकेतील एक 71 वर्षांच्या आजी फिटनेससाठी अनेकांचा आदर्श ठरत आहेत. मॅरी डफी या आजी आमच्या प्रेरणास्थान असल्याचे अनेकांनी सांगितले. त्यांनी वयाच्या साठीनंतर व्यायामाला सुरुवात केली आणि त्यानंतर त्या पॉवरलिफ्टिंग चॅम्पियन बनल्या आहेत. तसेच 30 राज्य आणि अनेक आतंरराष्ट्रीय विक्रमही त्यांनी आपल्या नावावर नोंदवले आहेत.

आपण 10 वर्षांपूर्वी जिम आणि व्यायाम करण्याबाबत गंभीरतेने विचार सुरू केला. आपले वजन खूप वाढले होते. चेहऱ्यावर सुस्ती होती. अशक्तपणा वाटत होता. त्यामुळे ही परिस्थिती बदलण्यासाठी जिम सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचे मॅरी यांनी सांगितले. जिम सुरू केल्यावर काही दिवसातच फरक जाणवायला लागला. दिवसभर उत्साही वाटायचे. तसेच वजन कमी झाल्याने अशक्तपणा आणि सुस्तीही दूर झाली.

या सकारात्मक बदलांमुळे जिममध्ये जास्त वेळ देत पॉवरलिफ्टिंगवर लक्ष केंद्रीत केल्याचे मॅरी यांनी सांगितले. आपण तरुणपणातही जिम करत होतो. मात्र, त्यावेळी मजा म्हणून जिम करायचो. मात्र, आता यावर लक्ष केंद्रीत केले होते. 2007 मध्ये आपल्या आईचे निधन झाल्याने आपण डिप्रेशनमध्ये होतो. दोन वर्षे आपण घरातच बसून होतो. त्यामुळे आपले वजनही वाढले होते. या नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी आपण जिमकडे लक्ष देण्यास सुरुवात केली.

जिम करण्यास सुरुवात केल्यावर त्याचे सकारात्मक परिणाम दिसू लागले. सध्या आठवड्यात दोन वेटलिफ्टिंगचे सेशन्स असतात. तसेच कार्डिओ आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग आपण करतो. जिम सुरू केल्यानंतर वेटलिफ्टिंगमध्ये आपल्याला आवड निर्माण झाली. तसेच अनेक स्पर्धांमध्ये भाग घेण्यासही त्यांनी सुरुवात केली. 64 व्या वर्षी 2014 मध्ये त्यांनी पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत भाग घेण्याचा निर्णय घेतला.

आपण जिममध्ये तीन तास मेहनत करतो. त्यावेळी काहीजण टोमणे मारतात. त्यावेळी आपल्याला आदर्श मानणारे तरुण त्यांना आपल्या विक्रमाबाबत माहिती देतात. त्यामुळे कोणाच्याही वयावरून कोणतेही अंदाज मांडू नका. वयात काहीच नसते. मनाने ठरवले तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही, असे त्या सांगतात. तुम्ही भूतकाळ बदलू शकत नाही. मात्र, वर्तमानाचा चांगला उपयोग करून भविष्य नक्कीच घडवू शकतात. मॅरी यांच्या या सकारात्मक विचारांमुळेच त्या अनेकांच्या प्रेरणास्थान बनल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या