<<< दुर्गेश आखाडे
ठेकेदार कंपनीच्या कामचुकारपणामुळे मुंबई-गोवा महामार्गाची दयनीय अवस्था झाली आहे. लांजा शहरातून जाणाऱ्या रस्त्याला आणि उड्डाणपुलाला कोणी वाली नाही अशी अवस्था आहे. दहा वर्षे उलटली तरी अजून लांजा शहरातील रस्ता आणि उड्डाणपुलाचे काम रखडलेले आहे. खोदकाम केलेला रस्ता आणि उड्डाणपुलाचा सांगाडा उभा करून ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने लांजावासीयांच्या सहनशीलतेचा अंत पाहिला असून रखडलेल्या कामावरून भविष्यात उद्रेक होण्याची शक्यता आहे.
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू झाले तेव्हा लांजावासीयांना आनंद झाला होता. कारण हा महामार्ग लांजा शहरातून जात होता. लांजा शहरात उड्डाणपूल करण्याचे निश्चित झाल्याने रस्त्यालगतच्या बाजारपेठेचे अस्तित्व टिकणार होते. दहा वर्षांपूर्वी लांजा शहरातील रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली होती. जुना रस्ता फोडला. उड्डाणपुलासाठी मोठे खांब उभे केल्यानंतर पुढे काम रखडले. मुख्य बाजारपेठ असलेल्या गर्दीच्या ठिकाणी अर्धवट फोडलेला रस्ता आणि सांगाड्यासारखे उभे करून ठेवलेले उड्डाणपुलाचे खांब पाहत लांजावासीय गेली दहा वर्षे मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाची वाट पाहत आहेत. लांजा शहराच्या मुख्य बाजारपेठेतून हा महामार्ग जातो. बाजारपेठेबरोबरच रस्त्याच्या दुतर्फा शाळा, महाविद्यालय, पोलीस ठाणे, बस स्टॅण्ड, रुग्णालय आणि शासकीय कार्यालये आहेत. त्यामुळे या परिसरात मोठी रहदारी असते.
महामार्गाचे काम रखडल्याने त्याचा त्रास शहरात कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना भोगावा लागतो. त्यामुळे लांजा शहरातील उड्डाणपूल आणि रस्त्याचे काम लवकर होणे गरजेचे आहे. काही दिवसांपूर्वीच रखडलेल्या रस्त्यामुळे संतापलेले ग्रामस्थ रस्त्यावर उतरले होते. भविष्यातही रखडलेल्या रस्त्यावरून उद्रेक होण्याची चिन्हे आहेत.दहा वर्षे उलटली तरी लांजा शहरातील रस्त्याच्या कामात कोणतीही प्रगती झालेली नाही. रस्त्याचे काम पुर्वगतीने सुरू आहे.
वाहनांची कसरत… पादचाऱ्यांची सर्कस
मुंबई-गोवा महामार्गावर पालीपासून पुढे देवधेपर्यंत आणि लांजा शहरात रस्त्याचे काम रखडले आहे. लांजा शहरात चौपदरीकरणाच्या कामासाठी रस्त्यात खोदकाम करण्यात आले. बाजारपेठेत उड्डाणपुल उभारण्यासाठी भले मोठे सिमेंटचे खांब उभे केले आहेत. या अर्धवट खांबामुळे वाहतुकीला प्रचंड अडथळा निर्माण होत आहे. खोदकामामुळे रस्त्यात पावसाळ्यात चिखल आणि खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे, तर रस्ता ओलांडताना पादचाऱ्यांना ‘सर्कस’ करावी लागत आहे.