कनिष्ठ जागतिक कुस्ती स्पर्धेत सांघिक विजेतेपद पटकावित इतिहास घडविणाऱ्या हिंदुस्थानी मुलींच्या संघाचे मायदेशी परतताना चक्क विमान चुकले. राष्ट्रीय क्रीडा प्राधिकरण (साई) आणि राष्ट्रीय कुस्ती महासंघ (डब्लूएफआय) यांच्या गलथान कारभारामुळे या मुली अम्मान (जॉर्डन) विमानतळावरच अडकून पडल्या. त्यामुळे ‘साई’ आणि ‘डब्ल्यूएफआय’च्या या निष्काळजीपणाबद्दल देशभरात टीकेची झोड उठली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 17 वर्षांखालील वयाच्या 9 कुस्तीपटू (मुली) आणि 3 प्रशिक्षक शनिवारी संध्याकाळी हिंदुस्थानात परतणार होते, मात्र या जगज्जेत्या मुलींचा कुस्ती संघ जॉर्डनमधील अम्मान विमानतळावर अडकला आहे. ‘पीटीआय’ने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, कुस्तीपटूंचे उड्डाण चुकले आहे. कारण ‘साई’ने खेळाडू आणि प्रशिक्षकांची तिकिटे वेगवेगळय़ा एअरवेजवर बुक केली होती. प्रशिक्षक जय भगवान, शिल्पी शेओरन आणि रेखा राणी हे दुबईमध्ये थांबलेल्या एमिरेट्सच्या विमानात बसणार होते, तर कुस्तीपटूंसाठी कतार एअरवेजवर बुकिंग करण्यात आली होती.
प्रशिक्षकांची फ्लाइट (केई 904) अम्मानहून संध्याकाळी 6ः10 वाजता निघून रात्री 10ः10 वाजता दुबईला पोहोचणार होती. तेथून त्यांना पहाटे 3.55 वाजता दुसऱया विमानात बसून सकाळी 9ः05 वाजता दिल्लीला पोहोचायचे होते. त्याचवेळी कुस्तीपटूंचे विमान (क्यूआर 401) रात्री 8ः30 वाजता निघून 11ः10 वाजता दोहाला पोहोचणार होते, मात्र हे विमान फक्त 6ः18 वाजता निघाले. फ्लाइटच्या वेळा बदलल्या की नाही हेदेखील स्पष्ट झालेले नाही.
कुस्तीपटूंचे भविष्य सुरक्षित हातात आहे का?
‘साई’ने दोनच दिवसांपूर्वी एका पोस्टमध्ये लिहिले होते की, ‘हिंदुस्थानी कुस्तीचे भविष्य सुरक्षित हातात आहे.’ मात्र ‘साई’ आणि ‘डब्ल्यूएफआय’च्या निष्काळजीपणामुळे 17 वर्षांखालील मुलींचा कुस्ती संघ जॉर्डनमध्ये अडकला. त्यामुळे हिंदुस्थानी कुस्तीपटू सुरक्षित हातात आहेत का? असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत.
डब्ल्यूएफआयची आता धावाधाव
जॉर्डनच्या स्वारीवर गेलेल्या 17 वर्षांखालील कुस्तीपटूंसोबत किमान एक तरी प्रशिक्षक असायला हवा होता. या लहान मुलींना असे वाऱयावर सोडायला नको होते, असा साक्षात्कार आता राष्ट्रीय कुस्ती महासंघाला (डब्ल्यूएफआय) झाला आहे. त्यामुळे आता त्यामुळे आता या कुस्तीपटूंना पहिल्या उपलब्ध विमानाने आणण्यासाठी ‘डब्ल्यूएफआय’ची धावाधाव सुरू झाली आहे.