चोरट्यांचा धुमाकूळ अन् पोलीस बदल्यांच्या मूडमध्ये

20

सामना प्रतिनिधी । पुणे

गेल्या दोन-तीन महिन्यांपासून शहरात साखळी चोरी, पर्स हिसकावण्याच्या घटनांमध्ये वाढ झालेली असली, तरी या चोरट्यांचा बंदोबस्त पोलिसांना करता आले नाही. पुणे शहर पोलीस दलातील अधिकारी बदल्यांच्या मूडमध्ये असून, चोरटे मात्र धुमाकूळ घालत आहेत अशी स्थिती आहे. पोलिसांच्या बंदोबस्ताची अन् नाकाबंदीची साखळी चोरट्यांनी सलग १२ गुन्हे करीत पोलखोल केली. गेल्या वर्षात जबरी चोरीच्या फक्त ९७ घटना घडल्या होत्या. मात्र, यंदा सहा महिन्यांत तब्बल ८९ घटना घडल्या आहेत.

पुणे पोलीस दलात सध्या एकच चर्चा रंगत आहे. पुण्यातील कोणत्या अधिकाऱ्यांची बदली होणार, नवीन पोलीस आयुक्त म्हणून कोण येणार, पोलीस निरीक्षक, सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक आपल्याला कोणते पोलीस ठाणे मिळणार, याच चिंतेत आहेत. आता आपली लवकरच बदली होणार असल्याने काहीजण सुट्या घेऊन बाहेर गेले आहेत. शहरात घरफोडी, साखळी चोरी, पर्स हिसकावण्याच्या घटना घडत असताना, सध्या बदल्यांचा मौसम सुरू असल्याने कोणीही गुन्हे उघडकीस आणण्याच्या मूडमध्ये नाही, असे काही अधिकारीही मान्य करतात.

वटपौर्णिमेला महिला सकाळी अंगावर भरपूर सोने घालून बाहेर पडतात. त्यामुळे साखळी चोरीच्या घटना घडू शकतात, याचा साधा विचारही गुन्हे शाखेतील पोलिसांसह स्थानिक पोलिसांनी केला नाही. ज्यावेळी सलग घटना घडल्या, अधिकारी तयार होऊन घराबाहेर पडेपर्यंत, नाकाबंदी लागेपर्यंत पावणेअकरापर्यंत चोरट्यांनी ११ साखळी चोरीचे गुन्हे केले. त्यामुळे त्यानंतर पोलिसांनी नाकाबंदी करूनही काहीच फरक पडला नाही. गेल्या दोन महिन्यांपासून शहरात पहाटेच्या वेळी स्वारगेट, शिवाजीनगर, कोथरूड, वारजे या भागांत रिक्षातून प्रवास करणाऱ्यांच्या हातातील पर्स, बॅग हिसकाविण्याच्या घटना घडत आहेत. यावरही नियंत्रण आणता आले नाही.

वटपौर्णिमेच्या दिवशी सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे यादिवशी बंदोबस्त लावण्याची गरज असते. याबाबत गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे यांना विचारणा केली, त्यावेळी ते म्हणाले की, याबाबतचा आदेश पोलीस उपायुक्त स्तरावरून पोलीस ठाण्यांना जाणे आवश्यक आहे. याबाबतचा आदेश गेला होता का, या घटना घडू नये म्हणून उपाययोजना केल्या होत्या का, याची चौकशी केली जाईल.

गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे म्हणाले, वटपौर्णिमेच्या दिवशी बंदोबस्त असणे गरजेचे होते. त्यासाठी पोलीस उपायुक्तांकडून पोलीस ठाण्यांना जाणे आवश्यक आहे. या घटना घडू नयेत, म्हणून काही उपाययोजना केल्या होत्या का, याची चौकशी केली जाईल.

आपली प्रतिक्रिया द्या