बोहल्यावर चढण्याआधीच बेड्या!

सामना प्रतिनिधी । मुंबई

दरोड्याच्या गुह्यात कसेही पकडले जातो, त्यामुळे दरोड्याऐवजी रिव्हॉल्वर विकण्याचा नवा धंदा सुरू करणाऱ्या राजकुमार कनोजिया उर्फ बबलू याला त्याच्या दोघा साथीदारांसह क्राइम ब्रॅच युनीट-९ च्या पथकाने पकडले. त्या तिघांच्या ताब्यात देशी बनावटीची पाच रिव्हॉल्वर आणि ३६ जिवंत काडतुसे सापडली. सहा महिन्यापूर्वी जामीनावर बाहेर आल्यानंतर बबलू आपल्या लग्नाच्या तयारीला लागला होता. पण बोहल्यावर चढण्याआधीच त्याच्या हातात पोलिसांच्या बेडया पडल्या.

वांद्रे रिक्लेमेशन येथे काही इसम रिव्हॉल्वर आणि काडतुसे विकण्यासाठी येणार असल्याची खबर एपीआय नितीन पाटील यांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश देसाई, राजेश पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली नितीन पाटील, किशोर पाटील, शरद धराडे, हरिष बनसोडे व पथकाने सी लिंक रोड पुलाखाली पाळत ठेवून मोहम्मद फैयाज शिखिलकर, भूपेंद्र सिंग आणि राजकुमार उर्फ बबलू या तिघांना पाच देशी बनावटीचे रिव्हॉल्वर आणि ३६ जिवंत काडतुसांसह रंगेहात पकडले.बबलू हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर मुंबई, ठाणे तसेच गुजरातमध्ये दरोडयाचे गुन्हे आहेत. सहा महिन्यापूर्वीच तो गुजरातच्या उमरगा तुरूंगातून जामीनावर बाहेर आला होता.

आपली प्रतिक्रिया द्या