आंब्याचा रस पडला साडेपाच लाखाला

26

सामना प्रतिनिधी । बीड

शहरातील अत्यंत वर्दळीच्या साठे चौकात दोन चोरट्यांनी भरदिवसा व्यापाऱ्याच्या कारची काच फोडून पिशवीत ठेवलेली ५ लाख ४० हजारांची रक्कम पळविल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे.

बीड तालुक्यातील नवगण राजुरी येथील ‘शंकर पार्वती जिनींग अँड प्रेसिंग फॅक्टरी’चे संचालक श्रीराम शंकरलाल झंवर यांनी कापूस खरेदीतील शेतकऱ्यांचे पैसे देण्यासाठी सोमवारी सकाळी बीड शहरातील मोंढा रोडवरील एसबीआय बँकेच्या शाखेतून सहा लाख रुपये काढले. त्यानंतर छत्रपती बँकेशेजारी असलेल्या त्यांच्या मालकीच्या नवगण अॅग्रो या दुकानात थांबून एका शेतकऱ्यास कापसाचे एक लाख रुपये दिले. उर्वरित पाच लाखांमध्ये स्वतःजवळील ४० हजार रुपये टाकून एकूण ५ लाख ४० हजाराची रक्कम त्यांनी एका पिशवीत ठेवली आणि स्वतःच्या कारमधून (एमएच २३ एडी ३५४२) राजुरीला जाण्यासाठी निघाले.

साठे चौकात आल्यानंतर झंवर यांनी उपवास असल्यामुळे आंब्याचा रस पिण्यासाठी गाडी थांबवली. पैशाची पिशवी गाडीतच ठेऊन आणि गाडी लॉक करून ते चालकास सोबत घेऊन हॉटेलात गेले. ही संधी साधून मोटारसायकलवर आलेल्या दोघा अज्ञात चोरट्यांनी कारच्या मागील दरवाजाची काच फोडली आणि आतील ५ लाख ४० हजारांची रक्कम ठेवलेली पिशवी घेऊन पसार झाले. रस पिल्यानंतर चालक गाडीजवळ आल्यावर त्याला काच फुटल्याचे दिसल्याने त्याने झंवर यांना हाका मारून बोलावून घेतल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले.

याप्रकरणी, श्रीराम झंवर यांच्या तक्रारीवरून दोन अज्ञात चोरट्यांवर बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. दरम्यान, सदरील दोन्ही चोरटे साठे चौकातील सीसीटीव्हीत कैद झाले असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत. दिवसाढवळ्या झालेल्या चोरीने नागरिकात खळबळ उडाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या