अभिनेते अनुपम खेर यांच्या कार्यालयात चोरी, तिजोरी व चित्रपटाचे निगेटीव्ह चोरले

बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. वीरा देसाई रोडवरील त्यांच्या कार्यालयावर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. या चोरट्यांनी त्यांच्या कार्यालयातून एका चित्रपटाचे नेगेटिव्ह चोरले आहेत. दरम्यान ही घटना कार्यालयातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून अनुपम खेर यांनी अंबोली पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार नोंदवली आहे. सध्या पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरू आहे.

अनुपम खेर यांनी स्वत: सोशल मीडिया पोस्टद्वारे या घटनेची माहिती दिली. ‘काल रात्री वीरा देसाई रोडवरील माझ्या कार्यालयात दोन चोरट्यांनी माझ्या कार्यालयाचे दोन दरवाजे तोडून लेखा विभागातील संपूर्ण तिजोरी ( जी कदचित ते तोडू शकले नाही) आणि आमच्या कंपनीने बनवलेल्या चित्रपटाचे निगेटिव्ह बॉक्स चोरून नेले. आमच्या कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटे दिसले आहेत. याबाबात आम्ही पोलिसात तक्रार केली असून पोलीस लवकर कारवाई करतील, असे त्यांनी या पोस्टमध्ये लिहिले आहे.

सदर घटना 19 जून रोजी घडली आहे. अनुपम खेर यांनी ट्विटरवर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये कार्यालयाचा दरवाजा फोडल्याचे दिसत आहे. मी आता तुमच्यासोबत शेअर केलेला व्हिडीओ पोलीस येण्यापूर्वी माझ्या ऑफिसच्या लोकांनी बनवला होता, असे त्यांनी पोस्टमध्ये म्हंटले आहे. अनुपम खेर यांची पोस्ट पाहून चाहते नाराज झाले आहेत. सर तुम्ही काळजी करू नका. पोलीस लवकरच चोरांचा शोध घेतील. असे म्हणत चाहत्यानी अनुपम खेर यांना धीर दिला आहे.