खाजखुजलीची पावडर टाकून साडेतीन लाखांची रोकड लंपास

31
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी । पुणे

पुण्यातील व्यापारी आणि पिंपरीतील उद्योजकाच्या अंगावर खाजखुजलीची पावडर टाकून साडेतीन लाखांचा ऐवज भामट्यांनी लांबविला. या घटनेमुळे नागरिकांना लुटण्यासाठी नवीनच शक्कल लढविल्याचे समोर आले आहे.

ग्लोरिया कार्डोस (वय ५२, रा. येरवडा) यांनी या संदर्भात येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गवारी यांनी दिली. कार्डोस यांचा बॅटरी पुरविण्याचा व्यवसाय आहे. व्यापाऱ्यांकडून मिळालेली एक लाखाची रोकड घेऊन ते काल दुपारी तीनच्या सुमारास येरवडा परिसरात सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेत ते आले होते. त्यांच्या आईच्या खात्यातून त्यांनी ३० हजार रुपये काढले. ही रक्कमही त्यांनी बॅगमध्ये ठेवली. ते दुचाकीवरून येरवडा परिसरातील पर्णकुटी येथून निघाले होते. त्यांच्या मानेला खाज सुटली. त्याच वेळी त्यांच्यामागून आलेल्या भामट्यांनी घाण पडल्याची बतावणी केली. नजीकच्या पानटपरीवर त्यांनी दुचाकी थांबविली. बॅग ठेवून ते पाणी आणण्यासाठी गेले. ही संधी साधून भामट्यांनी त्यांची बॅग लांबविली, असे उपनिरीक्षक रवींद्र गवारी यांनी सांगितले. या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक चोरटा कैद झाला असून, त्याचा शोध सुरू असल्याचे गवारी यांनी सांगितले.

कामगारांच्या पगारासाठी बँकेतून काढलेली अडीच लाखांची रोकड घेऊन जाताना मानेला खाज सुटल्याने दुचाकी बाजूला घेतलेल्या उद्योजकाकडील रोकड ठेवलेली पिशवी चार चोरट्यांनी लांबविली. मानेवर खाजखुजलीची पावडर टाकून रोकड लांबविल्याचे समोर आले आहे. ही घटना भोसरी-लांडेवाडी चौकात शुक्रवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. महेश यशवंत किराड (वय ४४, रा. भवानी पेठ, पुणे) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या