पोहेगावमध्ये इंडियन ओव्हरसीज बँकेचे एटीएम मशीनची चोरी; दीड लाखांची रक्कम लांबवली

कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथे इंडियन ओव्हरसीज बँकेचे एटीएम मशीन चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शनिवारी मध्यरात्री 3 वाजण्याच्या सुमारास घडली. त्यात 1 लाख 32 हजार रुपयांची रक्कम होती. हा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून याप्रकरणी शिर्डी पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. याप्रकरणी पोहेगाव इंडियन ओव्हरसीज बँकेचे मॅनेजर बी. डी. कोरडे आणि असिस्टंट मॅनेजर राम गौर यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पोहेगाव येथील इंडियन ओव्हरसीज बँकेचे एटीएम चोरट्यांनी मध्यरात्री 3 वाजण्याच्या सुमारास चोरून नेले. या चोरीत सुमारे चार ते पाच चोरटे सामील असावेत,अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. चोरून नेलेल्या एटीएममध्ये 1 लाख 32 हजाराची रोख रक्कम होती. चोरट्यांनी पिकअप टेम्पोला रोपच्या सहाय्याने एटीएम ओढून नेत गोदावरी उजव्या कॅनॉलच्या कडेला शिंदे वस्ती या निर्जन ठिकाणी नेल्याचा संशय सामाजिक कार्यकर्ते कैलास औताडे यांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी तपास केला असता या ठिकाणी एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न केला परंतु त्यात त्यांना अपयश आले. त्यामुळे त्यांनी एटीएम मशीन काटवनात लपवून ठेवले व रिकाम्या हाताने फरार झाले. सकाळी 5 वाजण्याच्या सुमारास चोरीचा प्रकार उघड झाला आहे.

शिर्डी पोलीसांच्या पथकाने बँकेचे सीसीटीव्ही फुटेज आणि शेजारील गौतम सहकारी बँकेचे सीसीटीव्ही फुटेज चेक करून ताब्यात घेतले आहे. कॅनालच्या कडेला लपवलेले मशीन पोलिसांच्या हाती लागले आहे . त्यांनी जेसीबीच्या साह्याने हे मशीन शिर्डी पोलीस ठाण्याला पाठवले आहे. पोहेगाव एटीएम चोरीची ही तिसरी घटना असून व्यापारी वर्गात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.