कौतुकास्पद कामगिरी! गेल्या वर्षभरापासून गावात एकही कोरोना पॉझिटिव्ह नाही; वाचा कसे राहिले सुरक्षित

कोरोना महामारीमुळे जगभरात सर्वांच्याच तोंडचे पाणी पळाले आहे. ऑक्सिजनची कमतरता, रुग्णाला बेड न मिळणे, डॉक्टरांची भरमसाठ बिले… अशा एक ना अनेक समस्या भेडसावत आहेत, मात्र याउलट परिस्थिती एका गावात आहे. वाचून आश्चर्य वाटेल पण आतापर्यंत येथे एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेला नाही.

राजस्थानातील बहुतांश गावात कोरोना रुग्णांचा मृत्यदर वाढत चालला आहे, मात्र याला सीकर जिल्ह्यातील खंडेला येथील ‘सुखपुरा’ हे गाव अपवाद ठरले आहे. सर्वत्र कोरोनाचा संचार असूनही संपूर्ण गाव आजही सुरक्षित आहे. अरावली टेकड्यांच्या पायथ्याशी असलेल्या आणि जवळपास 3000 लोकसंख्या असलेल्या या गावात गेल्या 13 महिन्यांपासून एकही कोरोना रुग्ण सापडलेला नाही.

गेल्यावर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आला तेव्हा गावतीलच लोकांनी गावात ये-जा करण्याचा मुख्य रस्ताच बंद केला. स्वयंशिस्त बाळगून आणि सावध राहून सर्व कामे केली. गावात बाहेरून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तिची तपासणी आणि चौकशी होत असते. कोरोनाची दुसरी लाट सुरू असल्याचाही कोणताच परिणाम येथील गावावर झालेला नाही.

मागील वर्षी लॉकडाउन जाहीर होताच प्रशासनासोबत आम्ही मिळून काम केले. गावातील मुख्य रस्त्यांवर बॅरिकेडस उभे केले. गावात ये-जा करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर लक्ष ठेवले जात होते. गावाबाहेर क्वारंटाईन सेंटरही तयार करण्यात आले होते. तेथे ग्रामस्थांच्या खाण्या-पिण्याकडे लक्ष ठेवले जात होते. स्वच्छतेच्या दृष्टिनेही काळजी घेतली जात होती. दररोज लोकांची तपासणी केली जाते. यामुळेच आज गाव सुरक्षित आहे, असे या गावातील लोकांचे म्हणणे आहे.

दररोज कोरोना रुग्णांचा वाढता आकडा पाहता सूखपूर गावात 13 महिन्यांत एक रुग्ण न आढळल्यामुळे या गावच्या ग्रामविकास अधिकाऱ्यांनीही गावकऱ्यांचे कौतुक केले आहे. ग्रामस्थांनी प्रशासनाला हातभार लावला, मदत केली यामुळेच गुरारा ग्रामपंचायतीत येणारे सुखपुरा गाव लहान मुलांपासून वयोवृद्दांपर्यंत महामारीच्या काळात सुरक्षित आहे, असे त्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या