विधानसभेतील भुताने आमदारांना पछाडलं

46

सामना ऑनलाईन । जयपूर

‘विधानसभेत भूत दिसतं त्यामुळे विधानसभा उपाध्यक्षांनी समिती स्थापन करून विधानसभेत किती भुते आहेत याची चौकशी करावी’ अशी मागणी राजस्थानच्या आमदारांनी केली आहे. इतकंच नाही तर या भूताचं विधानसभेत वास्तव्य असल्याने सभागृहाची २०० ही सदस्य संख्या फार काळ टिकत नाही, अशी तक्रार या आमदारांनी केलीय.

भाजप आमदार कल्याण सिंह चौहान यांचा मंगळवारी रात्री मृत्यू झाला. या मृत्यूनंतरच या आमदारांची भीती आणखी बळावलीय. भूताच्या भीतानं पछाडलेल्या या आमदारांनी थेट मुख्यमंत्री वसंधुरा राजे यांची या प्रकरणात भेट घेतलीय. मुख्यमंत्र्यांच्या भेटीत या आमदारांनी विधानसभेत भूत-आत्मा यांचा वावर असल्याचा दावा केला आहे. या ‘भूत’ बाधेला पिटाळण्यासाठी सभागृहात तातडीने पूजा-विधी करावी असं साकडंच त्यांनी यावेळी घातलं.

राजस्थान विधानभवनाची वास्तू ही स्माशनभूमीच्या जागेवर बांधलीय. त्यामुळेच अशा घटना घडत आहेत. ही वाईट शक्ती नुकसानकारक आहे, असा दावा कालूलाल गुर्जर यांनी केलाय. तर कालूलाल राज्यात अंधश्रद्धा पसरवत आहेत अशी टीका काँग्रेसचे आमदार धीरज गुर्जर यांनी केलीय.

आपली प्रतिक्रिया द्या