बँक आणि एटीएममधून पैसे काढण्यावरील निर्बंध मागे घेतले

सामना ऑनलाईन । मुंबई

मोदी सरकारने नोटबंदी केल्यानंतर बँक आणि एटीएममधून पैसे काढण्यावर आलेले सर्व निर्बंध आजपासून मागे घेण्यात आले आहे. रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे आता बँकेतून आणि एटीएममधून स्वतःच्या खात्यात असलेल्या पैशांतील कितीही रक्कम रोखीने काढून घेता येणार आहे.

भ्रष्टाचार, काळा पैसा, बनावट नोटा यांना आळा घालण्यासाठी मोदी सरकारने ८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटबंदी लागू केली. जुनी ५०० आणि १०००ची नोट चलनातून बाद करण्यात आली आणि नवी ५०० तसेच २०००ची नोट चलनात दाखल करण्यात आली. नव्या नोटांचा आकार चलनात असलेल्या इतर नोटांपेक्षा वेगळा असल्यामुळे तसेच या नोटा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होण्यास वेळ लागणार असल्यामुळे बँक आणि एटीएममधून पैसे काढण्यावर निर्बंध लादण्यात आले होते. हे निर्बंध टप्प्याटप्प्याने मागे घेत अखेर आजपासून पूर्णपणे मागे घेण्यात आले आहेत.

याआधी नोटबंदी लागू केल्यानंतर मोठ्या प्रमाणावर २०००च्या नोटा उपलब्ध करुन देण्यात आल्या. या नोटा म्हणजे सामान्यांसाठी ‘असून अडचण आणि नसून खोळंबा’ असा प्रकार झाला. प्रत्येकवेळी २०००ची नोट खर्च करायची ठरवले तर सुट्या पैशांची अडचण यायची. ही समस्या आजही काही प्रमाणात लोकांना जाणवत आहे.

सरकारने कमी मूल्याच्या नोटा उपलब्ध करुन देण्यास बराच वेळ लावला. लोकांना नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग वापरा, डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरा, कॅशलेस व्यवहार करा असे आवाहन मोदी सरकार करत होते. देशात अर्थसाक्षरतेचा अभाव आणि कॅशलेस व्यवहारांसाठी पुरेशी पायाभूत व्यवस्था नसताना मोदी सरकार लोकांना कॅशलेस होण्यास सांगत होते. या सगळ्यातून नाराजी वाढेल हे जाणवू लागताच निवडणूक डोळ्यापुढे ठेवून विशिष्ठ भागांमध्ये कमी मूल्याच्या नोटांची संख्या प्राधान्याने वाढवण्यात आली. टप्प्याटप्प्याने बँक आणि एटीएममधून पैसे काढण्यावर असलेले निर्बंध मागे घेण्यास सुरुवात झाली. अखेर आज सर्व निर्बंध मागे घेण्यात आले.