WTC Final India vs New Zealand – ज्याची भीती होती तेच झालं, सामन्याचं पहिलं सत्र पावसामुळे वाया गेलं

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम मुकाबल्याकडे डोळे लावून बसलेल्या क्रिकेटरसिकांना निराश करणारी बातमी आहे. पावसामुळे या कसोटी सामन्याचे पहिले सत्र वाया गेले आहे. पहिल्या सत्राचा खेळ होणार नसल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. साऊथहॅम्पटन भागात काल रात्रीपासून पाऊस पडत होता. सामना सुरु होण्याच्या वेळीही पाऊस थांबला नव्हता. पंचांनी सामन्यापूर्वी मैदानाची पाहणी केली तेव्हाही पाऊस थांबला नव्हता, यामुळे पहिल्या सत्राचा खेळ होऊ शकणार नाही असं जाहीर करण्यात आलं.

बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित हिंदुस्थान विरूद्ध न्यूझीलंड कसोटी सामना आजपासून सुरू होणार आहे. मात्र सामन्याला सुरुवात होण्याचा आधीच पाऊस क्रिकेटरसिकांच्या आनंदावर विरजण घालणार अशी दाट शक्याता होती. या पावसामुळे सामना वेळेत सुरू होईल की नाही हे ही सांगणं अवघड झालं होतं. अखेर पावसाने जी भीती वाटत होती ती खरी ठरवली आणि त्याने ब्रेक न घेता त्याचं काम चालूच ठेवलं, ज्यामुळे सामन्याला वेळेत सुरुवात होऊ शकली नाही. गुरुवारी रात्रीपासून मैदान परिसरात पाऊस पडत असून बातमी प्रसिद्ध होतेवेळीही तिथे पावसाची रिमझिम सुरू होती. वेदर डॉट कॉम या हवामानविषयक वेबसाईटने उद्याही या भागात पावसाची शक्यता वर्तवली आहे.

हिंदुस्थानी संघाचा अष्टपैलू क्रिकेटपटू रवींद्र जाडेजा याने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. मैदानाच्या बाल्कनीत उभा राहून त्याने हा फोटो काढला आहे. यामध्ये तो कॉफी पीत पावसाचा आनंद लुटताना पाहायला मिळत आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपदासाठीच्या सामन्याला 3 वाजेपासून सुरुवात होणार होती आणि 2.30 वाजता नाणेफेक होणार होती.

आपली प्रतिक्रिया द्या